क्रांतिकारकांचा शेकडो पत्रांचा खजिना दुर्लक्षित : अनेक ऐतिहासिक दस्ताऐवजांचा संग्रह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 01:34 AM2018-05-22T01:34:13+5:302018-05-22T01:34:13+5:30
कोल्हापूर : दिवंगत राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग हे पंजाबचे मुख्यमंत्री असताना शहीद भगतसिंग यांच्या मातोश्रींचा पंजाब शासनाच्या वतीने गौरव करण्याचे ठरविले होते. मानपत्र, थैली, मोटारगाडी देण्याचा तो कार्यक्रम होता.
समीर देशपांडे ।
कोल्हापूर : दिवंगत राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग हे पंजाबचे मुख्यमंत्री असताना शहीद भगतसिंग यांच्या मातोश्रींचा पंजाब शासनाच्या वतीने गौरव करण्याचे ठरविले होते. मानपत्र, थैली, मोटारगाडी देण्याचा तो कार्यक्रम होता.
या कार्यक्रमाची निमंत्रणे अनेकांना गेली तसे ते कोल्हापूरच्या एका नागरिकाला आले. नव्हे, पंजाबच्या त्या वीरमातेने संबंधितांना सांगितले होते, ‘माझा एक मुलगा कोल्हापूरला राहतो. त्यालाही निमंत्रण पाठवा.’ या सन्मानाचे भाग्य लाभलेले हेच बा. बा. महाराज होत.
इंग्रजी दैनिकांमध्ये काम करणारा पत्रकार, एक इतिहास व पुराणवस्तू संशोधक, अनेक भाषांवर प्रभुत्व असलेला लेखक अशा विविध भूमिकांमधून कोल्हापूर नगरीत कार्यरत राहिलेले बा. बा. महाराज यांची २४ फेब्रुवारी २०१८ पासून जन्मशताब्दी सुरू झाली आहे. मात्र ‘शहीद भवन’ उभारून त्यामध्ये क्रांतिकारकांचे जीवन आणि त्यांच्या अनेक वस्तू, शेकडो पत्रे, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक यांच्या रक्षा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे सहकारी आणि व्हायोलीनवादक रामसिंग यांच्या वापरातील गुप्ती अशा अनेक वस्तू एकत्रित प्रदर्शित करण्याचे त्यांचे स्वप्न अधुरेच राहिले आहे.
ते मूळचे साताऱ्याचे. नंतर कोल्हापूर हीच त्यांची कर्मभूमी बनली. ‘टाइम्स’बरोबर त्यांनी फ्री प्रेस, सेंटिनल, बॉम्बे क्रॉनिकल या दैनिकांमध्ये काम केले. मात्र त्यांचा मूळ पिंड हा स्वातंत्र्यसैनिकाचा होता, इतिहास संशोधकाचा होता. बाबांनी नाना पाटील, बर्डे गुरुजींच्या सहवासात पत्री सरकारचा अनुभव घेतला. डॉ. जे. पी. नाईक आणि त्यावेळचे पोलीस निरीक्षक एफ. डी. रोच यांनी बाबांच्या आयुष्याची दिशाच बदलवून टाकली. नाईक यांनी त्यांना त्यांच्या आवडत्या पुरातत्त्व खात्याकडे वळविले. कोल्हापूरमध्ये ब्रह्मपुरीत डेक्कन कॉलेजमार्फत डॉ. सांकलिया आणि एम. जी. दीक्षित हे उत्खनन करीत होते. त्यात बाबांचा समावेश केला. संशोधनानिमित्ताने त्यांनी सारनाथ, नालंदा, खजुराहोबरोबरच भारतभर अनेक वेळा प्रवास केला. प्राचीन स्थळे आणि उत्खननाचा अभ्यास केला.
याच वेळी दिवंगत राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी त्यांना संशोधकाच्या अंगाने स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास लिहिण्यास सांगितले. माजी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा यांनीही बाबांची चिकाटी, धडपड पाहून प्रवासासाठी त्यांना मदत केली होती. करवीर नगर वाचन मंदिराच्या आवारात सापडलेल्या सुवर्णमुद्रा असोत किंवा केशवराव भोसले नाट्यगृहाजवळ पाया खोदताना मिळालेल्या देवांच्या मूर्ती, ताम्रपटाबद्दलही बाबांनी एक संशोधक म्हणून केलेले मार्गदर्शनच अखेर प्रमाण मानावे लागले.
बा. बा. महाराज यांचे संकलन
झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे इंग्रजीतून चरित्रलेखन, ‘फ्रीडम मूव्हमेंट कलेक्शन ट्रस्ट’ची स्थापना, ‘शहीद भवन’ उभारण्याचा संकल्प, क्रांतिवीर चिमासाहेब यांनी फिरंगोजी शिंदे यांना दिलेला जांबिया, १८५७ च्या बंडाची नोंद असलेल्या तसेच भगतसिंगांच्या फाशीची नोंद असलेल्या पंचांगांची प्रत, भगतसिंगांच्या घराण्याची वंशावळ, जुनी वृत्तपत्रे, शेकडो क्रांतिकारकांची पत्रे, अनेक नाणी, जुने नकाशे, अनेक शस्त्रे यांचे संकलन बा. बा. महाराज यांच्याकडे होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव राजेश त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत आहेत.