जिल्ह्यातील तीन हजारपेन्शनधारक हवालदिल
By admin | Published: February 15, 2015 12:17 AM2015-02-15T00:17:50+5:302015-02-15T00:41:48+5:30
पेन्शनचा प्रश्न : हयातीचे दाखले देऊनही भविष्यनिर्वाह निधीचा कानाडोळा
प्रवीण देसाई ल्ल कोल्हापूर
ज्यांना भविष्यनिर्वाह निधी लागू आहे, अशा खासगी क्षेत्रातील उद्योग, संस्था यांमधील निवृत्त कर्मचाऱ्यांना दिली जाणारी भविष्यनिर्वाह निधीची जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांतील पेन्शनच मिळालेली नाही. या कार्यालयाच्या बोटचेप्या धोरणामुळे जिल्ह्यातील तीन हजारांहून अधिक पेन्शनधारकांना वंचित राहावे लागत आहे. जिल्ह्यात एकूण जवळपास चार हजार पेन्शनर आहेत.
१९९५ च्या ईपीएस ९५ कायद्यानुसार १८६ खासगी उद्योग, संस्थांमधील जे कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी (प्रॉव्हिडंट फंड) भरतात, त्यांना ही पेन्शन लागू आहे. जिल्ह्यातील जवळपास चार हजार निवृत्त कर्मचारी या पेन्शनसाठी पात्र आहेत. यांतील तीन हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांतील पेन्शनच मिळालेली नाही.
५०० रुपयांपासून २००० रुपयांपर्यंत असलेली ही पेन्शन मिळण्यासाठी त्यांना ताराबाई पार्कातील या कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. हयातीचे दाखले नसल्याने ही पेन्शन दिली जात नसल्याचे या कार्यालयाकडून उत्तर दिले जात आहे.
वयाची साठी पार केलेला कर्मचारी जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून येतो. त्याला योग्य उत्तर देण्याऐवजी येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. आपल्या हक्काच्या पेन्शनसाठी या वयोवृद्ध पेन्शनधारकांना झगडावे लागत आहे.
या कार्यालयाला पेन्शनधारकाची खात्री करण्यासाठी लागणारे हयातीचे दाखले नोव्हेंबर महिन्यातच देण्यात आले आहेत. हयातीची खातरजमा ही ज्या राष्ट्रीयीकृत बॅँकेत कर्मचाऱ्याचे खाते आहे, तेथून हे दाखले या कार्यालयाकडे पाठविले जातात. त्यानंतर हे कार्यालय पेन्शनचे चेक काढते. या कार्यालयाकडे जवळपास ४००० लोकांचे हयातीचे दाखले नोव्हेंबर महिन्यातच दिले आहेत. त्यानुसार डिसेंबर महिन्यात सर्व पेन्शनधारकांना पेन्शनही मिळाली आहे; परंतु जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांतील पेन्शन न मिळण्याचे कारण हयातीचे दाखले मिळाले नसल्याचे सांगितले जात आहे.
एकदा आपण हयात असल्याचा दाखला राष्ट्रीयीकृत बॅँकेकडून या कार्यालयाला दिल्यानंतर पुन्हा तोच दाखला नाही म्हणून पेन्शन थांबविणे योग्य नाही, असा सूर पेन्शनधारकांमधून उमटत आहे. जर डिसेंबर महिन्यातील पेन्शन मिळते, तर आता का नाही? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
राष्ट्रीयीकृत बॅँकांकडून हयातीचे दाखले या कार्यालयाला देण्यात आले आहेत; परंतु संगणकातील सर्व्हरच्या तांत्रिक बिघाडामुळे ते मिळाले नसल्याचे या कार्यालयाचे म्हणणे आहे; परंतु पेन्शन केव्हा मिळणार हे सांगण्यास येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या जिवावर येते. विचारणा करण्यासाठी आलेल्या पेन्शनधारकांना मार्चनंतर बघूया, अशी उत्तरे दिली जातात, अशी पेन्शनधारकांची तक्रार आहे. यामुळे चौकशीसाठी फक्त हेलपाटेच मारून हातात काहीच पडत नसल्याने पेन्शनधारकांतून संतप्त सूर उमटत आहे.