अर्जुनवाडमध्ये रस्ता रुंदीकरणासाठी शेकडो झाडांची कत्तल;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:52 AM2021-09-02T04:52:38+5:302021-09-02T04:52:38+5:30
अर्जुनवाड : मिरज-शिरोळ रस्त्याच्या रुंदीकरणामुळे गेल्या दहा वर्षांत अर्जुनवाड ग्रामपंचायतीच्यावतीने लाखो रुपये खर्च करून लावण्यात आलेली शेकडो झाडे तोडल्याने ...
अर्जुनवाड : मिरज-शिरोळ रस्त्याच्या रुंदीकरणामुळे गेल्या दहा वर्षांत अर्जुनवाड ग्रामपंचायतीच्यावतीने लाखो रुपये खर्च करून लावण्यात आलेली शेकडो झाडे तोडल्याने हिरवाईने नटलेला परिसर उजाड झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गेल्या दहा वर्षांत अर्जुनवाड ग्रामपंचायतीने घालवाड-अर्जुनवाड, चिंचवाड-अर्जुनवाड, शिरोळ-अर्जुनवाड, दत्त कारखाना-अर्जुनवाड या रस्ताच्या दुतर्फा वेगवेगळ्या झाडांची रोपे लावली होती. ही रोपे रोजगार हमीतून लावल्याचे कागदोपत्री नोंदविली असली तरी केवळ उद्दिष्टपूर्तीसाठी व प्रसिध्दीसाठी हजारो रोपे दुरगामी विचार न करता लावण्यात आली होती. त्यामुळे हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच झाडे शिरोळ-मिरज मार्गावर जगली व जगविण्यात आली. पण या मार्गाचे रुंदीकरण होत असल्याने ठेकेदार याने लाखमोलाची झाडे तोडल्याने परिसर उजाड दिसत आहे.
दरम्यान, जितक्या झाडांची कत्तल करण्यात आली, तितकीच झाडे नव्याने लावून विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांनी जगविली पाहिजे, अशी ग्रामस्थांतून मागणी होत आहे. ठेकेदाराकडून तोडण्यात आलेल्या झाडांच्या मोबदल्यात तितक्याच झाडांचे वृक्षारोपण करण्यात यावे, अशी मागणी देखील होत आहे.
फोटो - ०१०९२०२१-जेएवाय-०५
फोटो ओळ - अर्जुनवाड (ता. शिरोळ) येथे रस्ता रुंदीकरणासाठी ठेकेदाराकडून झाडांची कत्तल करण्यात येत आहे.