जयसिंगपूरचे ‘आनंदी जीवन’ भागवते अनाथांची भूक
By admin | Published: May 17, 2016 10:25 PM2016-05-17T22:25:11+5:302016-05-18T00:19:10+5:30
संजय भोसले यांचा पुढाकार : सामाजिक संस्थेकडून मोफत अन्नछत्र, गेल्या दीड वर्षापासून उपक्रम
जयसिंगपूर : कोणीही भुकेने उपाशी राहू नये, या हेतूने येथील आनंदी जीवन सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने गोरगरीब, अनाथ, अपंग, मनोरुग्ण, गरजू पेशंट यांच्यासाठी एक मोफत अन्नछत्र
सरू केले आहे़ याचा वसा येथील संजय भोसले यांनी घेतला असून हा उपक्रम गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे़ त्यामुळे जयसिंगपूर शहरात अशा संस्थांचे कौतुक होत आहे़
समाजामध्ये अनेक लोक गरिबीच्या विळख्यात पडले आहेत़ वाढती महागाई ही सर्वसामान्य व निराधार व्यक्तींना घातक बनली
आहे़ या अनुषंगाने शहरात रस्त्यावर भीक मागणारे लोक अनेक आहेत़ मात्र, यांना दोनवेळचे जेवण मिळावे या हेतूने आनंदी जीवन सामाजिक बहुद्देशीय सामाजिक संस्था कार्यरत आहेत़
या संस्थेचे अध्यक्ष संजय भोसले यांची परिस्थितीही मध्यमवर्गीय
आहे़ त्यांनी गरिबीची जाणीव लक्षात घेऊन गेल्या दीड वर्षापासून मोफत अन्नछत्र सुरू केले आहे़ सांगली-कोल्हापूर महामार्गावरील बसस्थानकाजवळ हे अन्नछत्र सुरू केले आहे़
या अन्नछत्राचा दिवसभरात अनेक गोरगरीब, भिकारी, निराधार, मनोरुग्ण, अपंग असे लोक याचा लाभ घेत आहेत़ आनंदी जीवन ही
संस्था गोरगरिबच्यिंा जीवनाला आनंद देण्याबरोबर गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च चालविते,
विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांना शिक्षण देणे, गरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नाची जबाबदारी घेणे, निराधार व गरीब लोकांना वैद्यकीय सेवा देणे तसेच भिकारी लहान मुलांना भीक मागण्यापासून परावृत्त करून त्यांचे भविष्य घडविण्यासाठी त्यांना
आर्थिक बाजूने साहाय्य करून शिक्षणाची सोय उपलब्ध केली जात आहे़ तसेच अंत्यविधीचे
साहित्यही गरीब व्यक्तींना पुरविण्याचे काम या संस्थद्वारे होत आहे़ (प्रतिनिधी)
आनंदी जीवन संस्थद्वारे अनाथ व गोरगरीब जनतेला आनंदी बनविण्याचे काम ही संस्था करीत असून, जयसिंगपूर शहरातून अनेकांना आधार देण्याचे काम करीत आहे़ यातून एक सामाजिक उपक्रम करीत असून, दानशूर लोकांनी पुढे येऊन या संस्थेला मदत करण्याची गरज आहे़ यातूनच खरे सूख लागेल़
- संजय भोसले, अध्यक्ष,
आनंदी जीवन संस्था