बाबासाहेबांच्या स्मारकासाठी माणगाव ग्रामस्थांचे आमरण उपोषण
By इंदुमती सूर्यवंशी | Published: February 12, 2024 07:41 PM2024-02-12T19:41:12+5:302024-02-12T19:41:23+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मांडला ठिय्या
कोल्हापूर: विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त बांधण्यात आलेल्या लंडन हाउस, हॉलीग्राफी शो, जुना तक्या या विकासकामांचा लोकार्पण सोहळा व नियोजित राष्ट्रीय स्मारकाच्या कामाला सुरुवात व्हावी, या मागणीसाठी सोमवारपासून माणगाव ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले.
माणगावचे सरपंच व नियोजन समिती सदस्य राजू मगदूम यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्यांनी हे उपोषण सुरू केले असून, त्यांना पाठिंबा देण्यासाठी ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त बांधण्यात आलेल्या लंडन हाउस, हॉलीग्राफी शो, जुना तक्या या कामांचा लोकार्पण सोहळा कोरोनामुळे स्थगित करण्यात आला. त्यानंतर अद्याप हा कार्यक्रम न झाल्याने कोट्यवधींची इमारत धूळखात पडली आहे. बौद्ध समाजाने स्वमालकीची गट नं ८७ मधील १ हेक्टर ८२ आर इतके क्षेत्र शासनाच्या नावे विनामोबदला केली आहे. या जागेभोवती कंपाउंड बांधून त्यावर महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित घटना व ऐतिहासिक माणगाव परिषदेवरील शिलालेख तयार करावे, बुद्ध विहार व संलग्न परिसरात ग्रंथालय, किमान १०० भन्तेंसाठी निवासस्थान बांधावे, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती पुतळे व मुख्य प्रवेशद्वाराजवळ परिषदेचे जनक आप्पासाहेब पाटील यांचा पुतळा उभारावा, माणगाव परिषदेत संमत केलेल्या १५ ठरावांची माहिती असलेली प्रतिकृती बनविण्यात यावी, परिषदेचा माहितीपट, ५०० आसन क्षमतेचे छोटे थिएटर, वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था अशा सोयी-सुविधा निर्माण करण्यात याव्यात, असे विविध ठराव ग्रामसभेत करण्यात आले आहेत.
त्यांची अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. यात अख्तर हुसेन भालदार, राजगोंडा पाटील, अभिजित घोरपडे, सुधाराणी पाटील, वसुधा बन्ने, सुनीता मगदूम, विद्या जोग, स्वप्निला माने, गीतांजली उपाध्ये, रमिजा जमादार, नितीन कांबळे, मनोज आदाण्णा, संध्याराणी जाधव, संघमित्रा माणगावकर यांनी सहभाग घेतला आहे.