CoronaVirus Lockdown :जिल्ह्यातील ४८ हजार दिव्यांगांवर उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 02:06 PM2020-04-04T14:06:07+5:302020-04-04T14:14:36+5:30
जिल्ह्यातील सुमारे ४८ हजार दिव्यांग बांधव जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना घरातून बाहेर पडणे तसेच कोणत्याही रांगेत थांबणे शक्य नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दोन दिवसांपूर्वी बैठक घेऊन संंबंधित यंत्रणेला या संदर्भात निर्देश दिले आहेत; परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे चित्र आहे.
प्रवीण देसाई
कोल्हापूर : जिल्ह्यातील सुमारे ४८ हजार दिव्यांग बांधव जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना घरातून बाहेर पडणे तसेच कोणत्याही रांगेत थांबणे शक्य नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दोन दिवसांपूर्वी बैठक घेऊन संंबंधित यंत्रणेला या संदर्भात निर्देश दिले आहेत; परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे चित्र आहे.
कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामध्ये जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी व्यक्तींना सूट देण्यात आली आहे; परंतु दिव्यांगांना घरातून बाहेर पडणे व वस्तू खरेदी करण्यासाठी रांगेत थांबणे शक्य नाही. त्यामुळे त्यांच्यावर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे.
ही बाब लक्षात आल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी बैठक घेऊन दिव्यांग व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचे घरपोच वाटप करावे किंवा तत्काळ विनारांग रेशन द्यावे, असे निर्देश शहर प्रभाग समिती व ग्रामस्तरीय समितीला दिले. तसेच तात्पुरत्या निवारागृहातील दिव्यांगांची माहिती घेऊन त्यांना स्वयंसेवकांनी मदत देण्याबाबतही सांगितले आहे.
अंथरुणाला खिळलेल्या, तीव्र, अतितीव्र दिव्यांगांना सॅनिटायझर, मास्क, डेटॉल, फिनेल, आदी वस्तूही पुरविण्यात याव्यात. गरजू दिव्यांगांची आवश्यकता असेल तेथे स्वयंसेवी संस्थेमार्फत जेवणाची सोय करावी. राष्ट्रीय बँका व इतर बँकांमध्ये दिव्यांगांना रांगेत न थांबविता तत्काळ सेवा द्याव्यात. दिव्यांगांच्या शारीरिक दुर्बलतेमुळे त्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. त्यामुळे विशेष बाब म्हणून सर्व बँका, रेशन दुकानदारांनी त्यांना प्राधान्य द्यावे. यासह दिव्यांगांना एक महिन्याची आगाऊ पेन्शन देण्याची सूचनाही संबंधित विभागाला केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले असले तरी ग्राम व शहर स्तरांवरील समित्यांकडून याची कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही. काही गावांत दिव्यांगांनी ग्रामसेवकांना विचारणा केल्यावर त्यांच्याकडून आम्हाला अद्याप कोणतेही निर्देश आलेले नाहीत; त्यामुळे तुम्हाला जीवनावश्यक वस्तू मिळू शकत नाहीत, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे आम्ही जायचे कोणाकडे व दाद कोणाकडे मागायची, असा सूर दिव्यांग बांधवांमधून उमटत आहे. जिल्ह्यात जवळपास ४८ हजार दिव्यांग बांधव असून सर्वजण मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
दिव्यांगांना प्राधान्याने जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्यासंदर्भात ग्राम व शहर प्रभाग समित्यांना निर्देश दिले आहेत. त्यांना याबाबत पुन्हा सूचना देण्यात येतील. तरीही यामध्ये टाळाटाळ झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.
- दौलत देसाई,
जिल्हाधिकारी
केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशांनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तू घरपोहोच देण्याचे आदेश दिले आहेत; परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. विशेषत: ग्रामीण भागातील दिव्यांग मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.
- देवदत्त माने,
जिल्हाध्यक्ष, प्रहार अपंग क्रांती संघटना
दिव्यांग हे घराबाहेर पडू शकत नसल्याने त्यांना जीवनावश्यक वस्तू बाजारात जाऊन आणणे शक्य नाही. मदतीसाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील दिव्यांग बांधवांकडून फोन येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर मदत द्यावी.
- अनिल मिरजे,
जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र अपंग साहाय्य सेना