कुसूर, तारूखच्या डोंगरात प्राण्यांसह पक्ष्यांची शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:23 AM2018-04-10T00:23:20+5:302018-04-10T00:23:20+5:30
कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील कुसूर तसेच तारूख परिसरातील डोंगर बंदूकधारी शिकाºयांकडून पिंजला जातोय. दिवसा आणि रात्रीही येथे शिकारी केल्या जात आहेत.
गणेश काटेकर ।
कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील कुसूर तसेच तारूख परिसरातील डोंगर बंदूकधारी शिकाºयांकडून पिंजला जातोय. दिवसा आणि रात्रीही येथे शिकारी केल्या जात आहेत. मात्र, या शिकाऱ्यांना कसलीही भीती नसल्याने शिवारात काम करणाºया शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
कुसूरसह तारूख विभाग संपूर्ण डोंगराने वेढला आहे. डोंगरात घनदाट झाडी असल्याने वन्य प्राण्यांची संख्याही समाधानकारक आहे. परिणामी वन्य प्राण्यांची शिकार करणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. स्थानिकांनपेक्षा बाहेरील अनोळखी बंदूकधारी शिकाºयांचा वावर वाढलेला दिसतो. हे शिकारी सावजासाठी रात्रीच काय पण दिवसाही उघड्यावर बंदूक घेऊन फिरताना दिसत आहेत. त्यांना कसलाही धाक अथवा भीती दिसत नाही. परिणामी शिवारात सावजाची शिकार करताना अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
डोंगरात घनदाट झाडी असल्यामुळे वन्य प्राण्यांची संख्या चांगलीच वाढताना दिसत आहे. बिबट्या, साळींदर, ससा, कोल्हा, खवले मांजर, मोर-लांडोर, रानडुक्कर आदी वन्यप्राण्यांची संख्या चांगली आहे. सध्या डोंगरतील खाद्य, पाणी कमी झाल्याने या प्राण्यांनी खाद्याच्या शोधात आपला मोर्चा डोंगर पायथ्यालगतच्या बागायती शिवारात वळविला असल्याने अनेकदा रस्ता ओलंडताना या प्राण्यांचे दर्शन लोकांना होत आहे. हीच संधी साधून जिभेचे चोचले भागविण्यासाठी काही लोकांनी वन्य प्राण्यांना आपले लक्ष्य बनवले आहे. मोर, लांडोरी पक्ष्यांना दिवसा टिपले जात आहे. तर ससे, साळींदर, खवले मांजर, रानडुक्कर यांचा माग घेऊन रात्रीच्या वेळी कधी जाळ्यात तर कधी बंदुकीच्या निशाण्यावर टिपले जात आहे.
शिकाऱ्यांच्या या वर्तनामुळे शेतात काम करणारा शेतकरीच सावज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उघड्यावर बंदूक घेऊन फिरणारे हे शिकारी वनविभागाच्या निदर्शनास आले नसतील का?
असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
रिक्षाच्या केबलचा शिकारीसाठी वापर
सध्या सोशल मीडियावर पशु-पक्षांना पकडण्यासाठी नवनवीन शक्कल लढवून त्यांना जाळ्यात ओढल्याचे व्हिडीओ सर्रास दाखवले जात आहेत. त्याचप्रमाणे अनेक शिकाºयांकडून हे प्रयोग केले जात आहेत. तर सर्वात जास्त रिक्षांना वापरण्यात येणाºया केबलचा फास तयार करून पशुपक्ष्यांची शिकार केली जात असल्याचे दिसून येत आहे.
साळींदर पकडण्यासाठी त्याने काढलेल्या बिळाच्या तोंडावर तारेचा फास तयार करून ठेवला जातो तर दुसरीकडे असलेल्या बिळाच्या तोंडावर आग पेटवून धूर सोडला जातो. धुरामुळे साळींदर बाहेर पडते आणि अलगद फासामधे अडकते. मात्र उन्हामुळे डोंगरातील पालापाखोळा वाळल्यामुळे लगेच पेट घेऊन डोंगरांना वणवे लागत आहेत. परिणामी वनसंपत्ती नष्ट होत आहे.