धामोड परिसरातील जंगलात दिवसा शिकार

By admin | Published: February 29, 2016 12:34 AM2016-02-29T00:34:50+5:302016-02-29T00:56:37+5:30

वन्यप्राण्यांचे अस्तित्व धोक्यात : वनविभागाचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष; कारवाईची मागणी

Hunting day in the forest of Dhhamod area | धामोड परिसरातील जंगलात दिवसा शिकार

धामोड परिसरातील जंगलात दिवसा शिकार

Next

श्रीकांत ऱ्हायकर -- धामोड  -वन्य प्राण्यांना पोषक व उत्तम राहणीमान म्हणजे तुळशी-धामणीचा परिसर. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या परिसरात पाण्याची मुबलकताही पुरेशी असल्याने या परिसरात वन्य प्राण्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. गेल्या वर्षभरापासून परिसरात शिकारी दिवसाढवळ््या जंगलात घुसून या वन्य प्राण्यांची शिकार करीत आहेत. परिणामी, येथील वन्यप्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या चोरट्या शिकारीला वनविभागाचेच अभय असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणासंदर्भात राधानगरी पंचायत समितीचे सभापती जयसिंग खामकर यांनी आवाज उठविला आहे.
प्रचंड झाडी, मुबलक पाणी, प्रचंड विस्तीर्ण परिसर, जंगलझाडीत लपण्यास प्राण्यांना उत्तम वातावरण यामुळे केळोशी, खामकरवाडी, आपटाळ, मालपवाडी, शिंदेवाडी, पिलावरेवाडी व धामोड परिसरात गवे, सांबर, ससा, डुक्कर या प्राण्यांबरोबर दुर्मीळ असे मोर, लांडोर, खवल्यामांजर, साळींदर आदी प्राणी दिवसाही दिसतात. विशेष म्हणजे मोर, लांडोर, साळींदर, खवलेमांजर यासारखे दुर्मीळ प्राणी या परिसरात मोठ्या प्रमाणात अढळतात. वर्षभरापूर्वी या परिसरासाठी वन विभागालाच ‘भार’असणाऱ्या अधिकाऱ्याने हजेरी लावली. पण त्या अधिकाऱ्यांने वनविभागाचा
कोणताच ‘भार’आपल्या खांद्यावर न घेता जंगल संपत्तीच्या जोरावर
अवैध मार्गाने पैसा मिळविणाऱ्या लोकांना जवळ करून ‘अर्थपूर्ण’ वाटाघाटी करण्याचा तडाका लावला आहे. परिणामी, जंगली प्राण्यांच्या तस्करीसाठी त्यांची शिकार करण्याच्या प्रकारात वाढ झाली असल्याचे स्थनिकांकडून बोलले जात आहे.
या साऱ्यामुळे म्हासुर्ली परिमंडल वनविभागाच्या या गलथान कारभाराबाबत पंचायत समितीच्या मासिक बैठकीमध्ये वनविभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. दरम्यान, धामोड पंचायत समितीचे सभापती जयसिंग खामकर यांनी या विभागाचे वनपाल एम. बी. कुंभार यांच्या कामकाजावर आक्षेप घेत जोरदार प्रहार केला. संबंधित अधिकाऱ्याच्या कामकाजाबाबतची माहिती वरिष्ठांना कळविण्याच्या सूचना केल्या.
असे असतानादेखील चोरटी शिकार थांबलेली नाही. त्यामुळे जंगलातील प्राण्यांची संख्या घटण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांना कोणाचीच भीती नसल्याने वरिष्ठ पातळीवरच याची दखल घेऊन मुक्या वन्यप्राण्यांना अभय द्यावे, अशा प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमींकडून येत आहेत.


परिसरात आढळणारे दुर्मीळ वन्यजीव म्हणजे या परिसराची ओळख आहे. ती ओळख जर कोणी पुसण्याचा प्रयत्न करीत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही.
- जयसिंग खामकर, सभापती पंचायत समिती, राधानगरी


दुर्मीळ अशा वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्यांवर फ क्त कागदोपत्री कारवाई न करता व करण्यास प्रोत्साहित करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही तुरुंगात डांबल्याशिवाय पर्याय नाही.
- अशोक पाटील, कौलव - जिल्हाध्यक्ष पर्यावरण बचाव कृ ती समिती)


या परिसरातील वन्य जिवांच्याच जिवावर जर इथले अधिकारी उठले असतील, तर त्यांना उत्तर देण्यास इथली जनताच सक्षम आहे.
- बबन पाटील- शेतकरी

Web Title: Hunting day in the forest of Dhhamod area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.