जागेवरील अतिक्रमणावरुन हुपरीत राडा, गोंधळामुळे आली पोलीस अधिकाऱ्यालाच चक्कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2022 05:26 PM2022-01-01T17:26:58+5:302022-01-01T17:34:24+5:30
चर्मकार समाजाच्या जागेवर अतिक्रमण करण्याच्या कारणावरून दोन्ही गटात आज पुन्हा जोरदार राडा झाला. दोन महिलांनी अंगावर रॉकेल ओतून घेतले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ व आरडा ओरड झाली.
हुपरी : चर्मकार समाजाच्या जागेवर अतिक्रमण करण्याच्या कारणावरून दोन्ही गटात आज पुन्हा जोरदार राडा झाला. दोन महिलांनी अंगावर रॉकेल ओतून घेतले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ व आरडा ओरड झाली. या प्रचंड गोंधळामुळे बंदोबस्तासाठी असलेले तेथील सहायक पोलीस निरीक्षक पंकज गिरी यांना चक्कर आली. गिरी यांच्यावर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. मागील दोन दिवसापुर्वीच याच कारणावरुन गावात वाद झाला होता.
चर्मकार समाजाच्या जागेवर अतिक्रमण करण्याच्या कारणावरून मागील दोनच दिवसापुर्वीच गावात वाद झाला होता. आज पुन्हा याच कारणावरुन गावात दोन गटात जोरदार राडा झाला. यावेळी यातील एका गटाकडून झोपड्या पाडून टाकल्याचा आरोप करण्यात आला. पोलिस आणि आंदोलनकर्त्यांचा जोरदार आरडाओरडा आणि बघून घेण्याची भाषा यामूळे वातावरण तणावपूर्ण बनले. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला.
यावेळी बंदोबस्तासाठी आलेल्या सहायक पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांना तेथील गोंधळामुळे चक्कर आली. गिरी यांच्यावर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. तर अंगावर रॉकेल ओतून घेतलेल्या त्या दोन महिलांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
हुपरी हद्दीतील सिटी सर्व्हे नंबर २८८ मधील गट नंबर ९२५/८अ ही जमीन समस्त चर्मकार समाज दिली आहे. मात्र याचा कब्जा मिळावा म्हणून गेल्या सोमवारपासून उपोषण सुरू आहे. आंदोलनकर्त्यानी या जागेवर झोपड्या घातल्यामुळे चर्मकार समाजाच्या दुसऱ्या गटाने त्याला विरोध केला. त्यामुळे जोरदार मारामारी व दगडफेक झाली.