हुपरीतील सीईटीपी प्लँट अद्ययावत होणार
By admin | Published: November 17, 2014 11:38 PM2014-11-17T23:38:29+5:302014-11-17T23:52:57+5:30
पंचतारांकित औद्योगिक वसाहत : ७० लाखांचा खर्च अपेक्षित
तानाजी घोरपडे - हुपरी --तळंदगे, पट्टणकोडोली व इंगळी (ता. हातकणंगले) येथे औद्योगिक वसाहतीतील दूषित पाण्यामुळे गावातील पाण्याचे नैसर्गिक स्रोतही प्रदूषित होत आहेत. ग्रामस्थांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण करणाऱ्या रसायनमिश्रित प्रदूषित पाण्याबाबत उपाययोजना आवश्यक होत्या. यासाठी सीईटीपी प्लँटचे अत्याधुनिकीकरण करण्याचा निर्णय पंचतारांकित औद्योगिक वसाहत सीईटीपी को-आॅपरेटिव्ह इंडस्ट्रीजने घेतला आहे. या निर्णयाची लवकर अंमलबजावणी करून प्रदूषित पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवावी, अशी अपेक्षा ग्रामस्थ करीत आहेत.
रसायनमिश्रित प्रदूषित पाण्याबाबत पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांना अखेर दखल घ्यावीच लागली. तळंदगे ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने याविरोधात सातत्याने विविध पातळीवर उठविलेला आवाज व त्यास ‘लोकमत’ने सातत्याने दिलेले पाठबळ यामुळे सुमारे ७० लाख रु. खर्च करून सीईटीपी प्लँटचे अत्याधुनिकीकरण करण्याचा निर्णय पंचतारांकित औद्योगिक वसाहत सीईटीपी को-आॅपरेटिव्ह इंडस्ट्रीजने घेतला आहे.
पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील अनेक कंपन्यांमधून बाहेर पडणाऱ्या रसायनमिश्रित प्रदूषित पाण्यावर शुद्धिकरण प्रक्रिया करण्यासाठी तळंदगे गावानजीक सीईटीपी प्लँट उभारण्यात आला आहे. दहा लाख लिटर क्षमता असणाऱ्या या प्लँटच्या देखभाल-दुरुस्तीचे काम योग्यप्रकारे होत नसल्याने रसायनमिश्रित प्रदूषित पाणी गावाच्या ओढ्यात सरळ सरळ सोडण्यात येत असे. अशा प्रकारे गेल्या सहा वर्षांपासून सुरू राहिल्याने गावातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत (विहिरी, तलाव, विंधन विहिरी, ओढे) प्रदूषित झाले आहेत. यातूनच हजारो ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहेत. तसेच ओढा परिसरातील तळंदगे, पट्टणकोडोली व इंगळीतील पिकाऊ शेतजमिनीचा पोत बिघडण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. ग्रामस्थांनी अनेकवेळा याप्रश्नी विविध आंदोलनेही केली.
उपसरपंच राजेंद्र हवालदार, सागर चौगुले यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन शासनदरबारी हा प्रश्न सातत्याने लावून धरला होता. परिणामी औद्योगिक वसाहत महामंडळाचे कार्यकारी अभियंता एस. बी. भांडेकर व महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियामक महामंडळाचे सचिव राजीवकुमार मित्तल यांना विशेष लक्ष केंद्रित करावे लागले. ‘लोकमत’ने अनेकवेळा सातत्याने याप्रश्नी आवाज उठवून प्रदूषित पाण्यामुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्या मांडून ग्रामस्थांचा आवाज शासनदरबारी पोहोचविला.
‘लोकमत’चा पाठपुरावा
सरपंच मंगल वाघमोडे व उपसरपंच राजेंद्र हवालदार म्हणाले, औद्योगिक वसाहतीतून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यामुळे शेतीच्या पाण्याबरोबरच ग्रामस्थांचे आरोग्यही धोक्यात येत होते. त्याच्या विरोधात ग्रामस्थांच्या सहभागातून ग्रामपंचायतीने वेळोवेळी आंदोलने केली. त्याला ‘लोकमत’ने भक्कम पाठबळ दिल्यामुळेच आमचा आवाज शासन व प्रदूषण नियामक महामंडळापर्यंत पोहोचला गेला. त्यामुळेच हा जटील प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.
प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर
१याबाबत पंचतारांकित औद्योगिक वसाहत सीईटीपी को-आॅप. इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष सदानंद गुप्ता म्हणाले, प्रदूषित सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या अत्याधुनिक प्रकल्पाच्या देखभाल-दुरुस्तीचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.
२हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी सुमारे २० लाख रुपये खर्च असून, अत्याधुनिक पद्धतीचा प्रकल्प अस्तित्वात आणण्यासाठी आणखी ५० लाखांचा खर्च येणार आहे.
३हा संपूर्ण खर्च असोसिएशन करणार आहे. हा प्रकल्प दुरुस्तीनंतर कार्यान्वित झाल्यास शेतीच्या पाण्याचे होणारे प्रदूषण तसेच विहिरी, नाले यांत मिसळणारे सांडपाणी पूर्णत: बंद होणार आहे. हा प्रकल्प येत्या तीन महिन्यांत पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल, अशी आशा व्यक्त केली.