हुपरीच्या तलावाचे तरूणांच्या श्रमदानातून रूप पालटणार

By admin | Published: March 16, 2017 12:58 AM2017-03-16T00:58:16+5:302017-03-16T00:58:16+5:30

रंकाळ्याच्या धर्तीवर सुशोभीकरणाचे नियोजन : काढलेल्या ६00 ट्रॉल्या गाळाचे परिसरातील शेतकऱ्यांना मोफत वितरण

Hupri pond will transform the youth's labor force | हुपरीच्या तलावाचे तरूणांच्या श्रमदानातून रूप पालटणार

हुपरीच्या तलावाचे तरूणांच्या श्रमदानातून रूप पालटणार

Next

हुपरी : रौप्यनगरी हुपरी (ता. हातकणंगले) शहराच्या मध्यभागी असलेला व शहराचे वैभव म्हणून नावारूपास आलेल्या सूर्यतलावातून (गाढव तळे ) सुमारे ६00 ट्रॉल्या गाळ काढण्यात आला. हा गाळ परिसरातील शेतकऱ्यांना मोफत देण्यात आला. तलावाचे कोल्हापुरातील रंकाळ्याच्या धर्तीवर सुशोभीकरण करण्याचे नियोजन आखण्यात आले असून, यासाठी काही तरुणांकडून विशेष परिश्रम घेण्यात येत आहेत.
घाण, दलदल व दुर्गंधीच्या साम्राज्यात हा तलाव सापडला असून, नामशेष होण्याच्या मार्गावर होता. ही परिस्थिती वेळीच लक्षात घेऊन गावातील काही होतकरू तरुणांनी स्वयंस्फूर्तीने श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबवून हा सूर्यतलाव स्वच्छ केला आहे. शहराचा कारभार हाकणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे रौप्यनगरीचे लयास जात असलेले वैभव जोपासण्याच्या तरुणांच्या या उपक्रमास समाजातील सर्वच स्तरांतून मोठा पाठिंबा मिळाला. तरुणांच्या या उपक्रमाचे समाजाकडून कौतुकही करण्यात आले. ‘गाव करील ते राव काय करील’ या म्हणीची प्रचिती तरुणांनी सुरू केलेल्या या श्रमदानातून शहरवासीयांना निश्चितपणे झाली.
संपूर्ण देशात रौप्यनगरी असा नावलौकिक असलेल्या हुपरी शहराच्या अगदी मध्यावर हा सूर्यतलाव आहे. हा तलाव बाराही महिने पूर्ण भरल्याचे चित्र नेहमीच पाहावयास मिळते. परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती (पुतळा), लोकसेवक आबा नाईक विद्यालय, व्यवसाय उद्योगधंद्याने फुललेले छत्रपती शिवाजी मार्केट, मुख्य बसस्थानक, पोलिस ठाणे, तसेच अनेक नामांकित चांदी व्यावसायिकांचे वास्तव्य असलेली यशवंतनगर वसाहत, अशा चोहोबाजूंनी बहरलेल्या परिसरात हा सूर्यतलाव आहे. पूर्वी या तलावाला ‘गाढव तलाव’ म्हणून ओळखण्यात येत होते.
हुपरीच्या चांदी उद्योगाचे उर्ध्वयू हुपरीभूषण य. रा. तथा बापूसाहेब नाईक यांनी या तलावाचा परिसर शासनाकडून ताब्यात घेऊन या प्रशस्त ठिकाणी तलावात सूर्यमंदिर उभारण्याबरोबरच संपूर्ण परिसर सुंदर व निसर्गरम्य करण्याचा प्रयत्न चालविला होता. मात्र, रौप्यनगरीवासीयांच्या दुर्दैवाने त्यांचा हा उपक्रम त्यांच्या हयातीत पूर्ण होऊ शकला नाही. दरम्यानच्या कालावधीत बापूसाहेबांच्या या स्तुत्य उपक्रमाकडे सर्वांचेच मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाले. परिणामी, सूर्यतलाव नाव धारण केलेल्या या तलाव परिसराची अत्यंत वाईट व दयनीय परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळू लागले होते. परिसरात मोठ्या प्रमाणात उगवलेली खुरटी झाडे-झुडपे, पान वनस्पती, परिसरात साचलेला विविध प्रकारचा कचरा, यामुळे सर्वत्र घाण, दलदलीचे व दुर्गंधीयुक्त वातावरण पसरले होते. ग्रामपंचायत प्रशासनाने तर कधी या तलावाकडे साधे ढुंकूनही पाहिले नाही.
स्वच्छता तर फार लांबची गोष्ट आहे. अशा पद्धतीची अवकळा प्राप्त झालेल्या व दुर्लक्षित राहिलेल्या या तलावाची व परिसराची श्रमदानातून स्वच्छता करण्याचा प्रयत्न काही तरुणांनी गेल्या महिन्यापासून सुरू केला आहे. शहराचे लयास जात असलेले वैभव जतन करण्याच्या होतकरू तरुणांच्या या उपक्रमास समाजातील सर्वच स्तरांतून मोठा प्रतिसादही मिळाला. तलावातील दूषित व अस्वच्छ पाणी बाहेर काढून तलावामध्ये वर्षानुवर्षे साठलेला गाळ परिसरातील शेतकऱ्यांना मोफत वितरित करण्यात आला.


रौप्यनगरी हुपरी (ता. हातकणंगले) शहराचे वैभव असलेल्या सूर्यतलावाची (गाढव तळे ) स्वच्छता करून तलावातील गाळ शेतकऱ्यांना मोफत वितरित करण्यात येत आहे.

Web Title: Hupri pond will transform the youth's labor force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.