हुपरीचा पाणीपुरवठा चार दिवसांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2016 09:33 PM2016-06-16T21:33:08+5:302016-06-17T00:46:17+5:30

महावितरणने वीजपुरवठा तोडला : चार लाख बावीस हजार रूपयांचे वीज बिल थकीत

Hupri water supply has been closed for four days | हुपरीचा पाणीपुरवठा चार दिवसांपासून बंद

हुपरीचा पाणीपुरवठा चार दिवसांपासून बंद

Next

हुपरी : हुपरी नळपाणी पुरवठा योजनेकडील चार लाख बावीस हजार रुपये थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने योजनेचा वीजपुरवठा तोडल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून शहराचा संपूर्ण पाणीपुरवठा बंद आहे. थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी महावितरणने एक महिन्याच्या कालावधीत तीनवेळा योजनेचा वीजपुरवठा तोडल्यामुळे रौप्यनगरीची वरचेवर नाचक्की होत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या अशा प्रकारच्या बेफिकीर व गलथान कारभाराचा त्रास मात्र सर्वसामान्य शहरवासीयांना भोगावा लागत आहे. याचे ग्रामपंचायत प्रशासनास कसलेही सोयरसुतक नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
दरम्यान, सव्वा चार लाख रुपये थकीत वीजबिलाच्या रकमेपैकी ग्रामपंचायत प्रशासनाने दोन लाख रुपये रक्कम जमा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ही रक्कम भरून घेण्यास स्पष्टपणे नकार दिल्याच समजते. परिणामी वीज बिल भरण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना माघारी यावे लागले.
हुपरी शहराला पिण्याचे पाणीपुरवठा करणारी योजना दूधगंगा नदीवरून कार्यान्वित करण्यात आली आहे. योजनेचे महिन्याला सरासरी दोन लाख रुपयांचे बिल येत असते. वार्षिक सुमारे तीन कोटींचा महसूल शहरातून गोळा करणाऱ्या जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या व श्रीमंत ग्रामपंचायतीला ही वीज बिलाची रक्कम वेळेत भरणे अशक्य झाले आहे. वीज बिलाची रक्कम वेळेत भरली जात नसल्याने योजनेचा वीजपुरवठा अनेकवेळा तोडला जातो. अशा प्रकारची नामुष्की रौप्यनगरीवर वारंवार येते. याच कारणातून
वर्षातून अनेकवेळा शहराचा पाणीपुरवठा बंद पडतो. याप्रश्नी शहरवासीयांतून उठाव होऊ लागताच कशी तरी तरतूद करून वीज बिलाची रक्कम भरून पूर्ववत वीजपुरवठा जोडून पाणीपुरवठा सुरू केला जातो. अशी घटना नेहमीच पहावयास मिळते.
मात्र, अशी घटना पुन्हा घडू नये याबाबतची खबरदारी कुणाकडूनही घेतली जात नाही. ये रे माझ्या मागल्या.. अशी वस्तुस्थिती पुन्हा पहावयास मिळाल्याशिवाय राहत नाही.
शहरामध्ये सर्वच पक्षांचे मोठमोठे पदाधिकारी वास्तव्यास आहेत. मात्र, यापैकी एकही पदाधिकारी किंवा राजकीय पक्ष शहरवासीयांना पिण्याचे पाणी मिळत नाही म्हणून रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याचे साधे सौजन्य दाखवत नाही. त्यामुळे शहराचा सर्वांगीण विकास केवळ आम्हीच करीत आहोत, असा टेंभा मिरविणाऱ्या ग्रामपंचायत प्रशासनावर कुणाचाही वचक राहिलेला नाही असे चित्र नेहमीच अनुभवण्यास व पहावयास मिळत असते.


‘यापुढे पाणीपुरवठा खंडित होणार नाही’
सरपंच दीपाली शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, त्या म्हणाल्या, थकबाकी भरण्यासाठी रकमेची तजवीज केली आहे. ही रक्कम महावितरणमध्ये भरून पूर्ववत वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. असे प्रकार वारंवार घडून पाणीपुरवठा खंडित होऊ नये याची खबरदारी प्रशासन यापुढे घेत आहे.

Web Title: Hupri water supply has been closed for four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.