हुपरी पालिकेसाठी आवाज उठवणार
By admin | Published: March 30, 2015 08:36 PM2015-03-30T20:36:04+5:302015-03-31T00:26:41+5:30
जोगेंद्र कवाडे यांचे आश्वासन : शासनाला खडसावून जाब विचारणार
हुपरी : ६० हजार लोकसंख्या झाली असताना येथे नगरपालिका स्थापन करण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासनाला विधान परिषदेत चांगलेच खडसावून जाब विचारू, असे प्रतिपादन पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केले.
हुपरी नगरपालिका कृती समितीच्यावतीने नगरपालिका मागणीचे निवेदन निमंत्रक अहमद नदाफ व सहनिमंत्रक बाळासाहेब कांबळे यांनी प्रा. कवाडे यांना दिले. त्यावेळी ते बोलत होते.आमदार कवाडे यांनी सोमवारी हुपरीस धावती भेट दिली. यावेळी ते म्हणाले, हुपरी गावाने मला चांदीची तलवार देऊन अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ दिले. तेथे नगरपालिका स्थापन करण्यासाठी विधान परिषदेत आवाज उठवू. यावेळी अमदज नदाफ, बाळासाहेब कांबळे, मंगलराव माळगे, अशोकराव खाडे, रघुनाथ नलवडे, मुबारक शेख, डॉ. सुभाष मधाळे, पिपल्स रिपब्लिकनचे जिल्हाध्यक्ष दगडू भास्कर, नंदकुमार गोंधळी, आनंदा निकम, प्रवीण कुंभोजकर, आनंदा कांबळे, दिलीप शिंगाडे, विकास चव्हाण, धर्मवीर कांबळे, रमेश कांबळे, सचिन कांबळे, जयकुमार माळगे, संतोष नरंदेकर, विनोद खोत, वंदन कांबळे, यांच्यासह कृती समितीचे सदस्य उपस्थित होते.हुपरी नगरपालिकेच्या मागणीसाठी कृती समितीच्यावतीने सह्यांची मोहीम राबविण्यात येणार आहे. (वार्ताहर)
मुख्यमंत्र्यांना
शिवसेनेचे निवेदन
दरम्यान, हुपरीत नगरपालिका स्थापन करावी या मागणीसाठी जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईत निवेदन दिले. हुपरीच्या लोकसंख्येचा विचार करून हुपरीला नगरपालिकेचा दर्जा द्यावा, अशी आग्रही मागणी जाधव यांनी केली.