पिकांचे पंचनामे त्वरित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:25 AM2021-07-29T04:25:07+5:302021-07-29T04:25:07+5:30
इचलकरंजी : गावभाग परिसरातील शेतकऱ्यांचे महापुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांच्या जनावरांचा चारा व आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला ...
इचलकरंजी : गावभाग परिसरातील शेतकऱ्यांचे महापुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांच्या जनावरांचा चारा व आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे त्वरित करून त्यांना मदत द्यावी तसेच पीक कर्जाची रक्कम प्रतिहेक्टर वाढवून पीक कर्जावरील व्याज माफ करावे, अशा मागण्या पूरग्रस्त शेतकऱ्यांनी केल्या आहेत. यासंबंधीचे निवेदन शेतकऱ्यांनी प्रांत कार्यालयात दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, सन २०१९ पाठोपाठ यावर्षीही महापुराने थैमान घातले आहे. त्यामुळे नदीवेस, गावभाग, जुना चंदूर रोड यासह पूर क्षेत्रातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे त्वरित करून नुकसानभरपाई मिळावी. गोठा बांधण्यासाठी व घर बांधण्यासाठी दिलेल्या कर्जावरील व्याज माफ करावे, पुरामध्ये मृत झालेल्या जनावरांच्या मालकांना ५० हजार रुपयांची मदत द्यावी, जनावरांच्या खासगी डॉक्टरांचा संप मागे घेण्यास सांगून शेतकऱ्यांना सहकार्य करावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या शिष्टमंडळात सामाजिक कार्यकर्ते प्रमोद बचाटे, आनंदा कचरे, संभाजी चव्हाण, भीमगोंडा पाटील, श्रीकांत मिठारी, अक्षय मोरबाळे, आदींसह शेतकऱ्यांचा समावेश होता.