शित्तूर तर्फ मलकापूर येथे कोरोनाने पती-पत्नीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:21 AM2021-05-01T04:21:52+5:302021-05-01T04:21:52+5:30
माझे मम्मी, पप्पा कधी येणार असा प्रश्न पूर्वा आणि तन्मय नातेवाईकांना विचारत आहेत. बांबवडेपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर शित्तूर ...
माझे मम्मी, पप्पा कधी येणार असा प्रश्न पूर्वा आणि तन्मय नातेवाईकांना विचारत आहेत.
बांबवडेपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर शित्तूर तर्फ मलकापूर छोटंसं गाव आहे. येथील गणपती पाटील यांचा मुलगा महादेव गणपती पाटील पुण्यातील एका खासगी कंपनीत मोठ्या पदावर काम करीत होता. त्यांची पत्नी देखील नोकरीला होती. सुखाचा संसार सुरु असताना त्यांना नऊ वर्षांची पूर्वा व सहा वर्षांचा तन्मय अशी दोन मुले होती. कोरोनामुळे कंपनी बंद झाल्यावर दोघे पती-पत्नी गावी सुट्टीवर आले होते. पत्नीला किरकोळ त्रास जाणवू लागल्याने कोरोना टेस्ट केली असता दोघांची टेस्ट पॉझिटिव्ह आली . नातेवाईकांनी दोघांना कोल्हापुरातील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. आठ दिवस पती-पत्नी मृत्यूशी झुंज देत होते. बुधवारी दोघांची तब्येत अचानक बिघडली. महादेव यांच्या पत्नीने जगाचा निरोप घेतला. याची महिती महादेव यांना समजल्यावर मृत्यूने खचलेल्या महादेव यांची तब्येत खालावली. दोन दिवसांच्या अंतराने मध्यरात्री त्यांनी जगाचा निरोप घेतला. आपल्या कुटुंबातील दोघांच्या मृत्यूने पाटील कुटुंबीय सुन्न झाले. दोन लहान बालकांना काय सांगायचे असा प्रश्न नातेवाईकांसमोर पडला आहे. माझे मम्मी, पप्पा परत कधी येणार असे प्रश्न लहान बालके विचारत आहेत. महादेव पाटील यांच्या कुटुंबातील दोन भाऊ, वहिनी, पुतण्या यांची टेस्ट कोरोना पाॅझिटिव्ह आहे.