पती-पत्नीने घरातच चालवला वेश्याअड्डा, कोल्हापुरात समोर आला धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 12:57 PM2023-03-02T12:57:38+5:302023-03-02T12:58:00+5:30
पत्नीच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन पतीने घरातच सुरू केला होता वेश्याअड्डा
कोल्हापूर : पत्नीच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन पतीने घरातच वेश्याअड्डा सुरू केला होता. अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (दि. १) दुपारी बालिंगा (ता. करवीर) येथे छापा टाकून वेश्याअड्ड्यावर कारवाई केली. पीडित महिलेची सुटका करून पोलिसांनी तिच्या पतीला अटक केली.
अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाच्या सहायक पोलिस निरीक्षक श्रद्धा आंबले-बरगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बालिंगा परिसरात एका घरातच वेश्याअड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सोमवारी दुपारी छापा टाकला असता पतीकडूनच पत्नीच्या असहायतेचा गैरफायदा उठवत वेश्याअड्डा चालवल्याचे स्पष्ट झाले. पीडित महिला आणि तिचा पती दोघेही मूळचे कर्नाटकचे आहेत. दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी ओएलएक्सवरून बालिंगा परिसरात घर भाड्याने घेतले होते. अनैतिक मानवी प्रतिबंधक विभागातील रवींद्र गायकवाड, राजेंद्र घारगे, मीनाक्षी पाटील, किशोर सूर्यवंशी, अभिजीत पाटील, अश्विनी पाटील, तृप्ती सोरटे, किरण पाटील आदींनी ही कारवाई केली.
घर भाड्याने देताना घ्या काळजी
घर भाड्याने घेऊन गुन्हे करण्याचे प्रकार वाढत आहेत, त्यामुळे घर भाड्याने देताना घरमालकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे. भाडेकरूचे ओळखपत्र, मोबाइल नंबर घ्यावेत, त्यांच्या नातेवाइकांची माहिती घ्यावी, भाडेकरार करावा, शेजाऱयांना भाडेकरूंची कल्पना द्यावी, तसेच स्थानिक पोलिसांनाही माहिती देणे आवश्यक असल्याचे बलकवडे यांनी सांगितले.