महिला अधिकाऱ्याच्या पतीचा पोलीस ठाण्यात धिंगाणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:26 AM2021-05-26T04:26:17+5:302021-05-26T04:26:17+5:30
कोल्हापूर : पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या विरोधात शहरातील एका पोलीस ठाण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याच्या पतीने धिंगाणा घातला. त्याने दुय्यम दर्जाच्या ...
कोल्हापूर : पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या विरोधात शहरातील एका पोलीस ठाण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याच्या पतीने धिंगाणा घातला. त्याने दुय्यम दर्जाच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्याना अर्वाच्च व अरेरावीची भाषा वापरली. मंगळवारी सायंकाळी सुमारे तासभर घातलेल्या या गोंधळामुळे पोलिसांच्या अब्रूची लक्तरे वेशीवरही टांगल्याची प्रतिक्रिया पोलिसांतून उमटत होती, हा विषय शहरातील पोलिसांत चर्चेचा ठरला.
कोरोना प्रार्दुभावाच्या अनुषंगाने प्रशासनाने निर्बंध घातले. निर्बंधाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून करवाई सुरू आहे. मंगळवारी सायंकाळी शहरात विनाकारण फिरणाऱ्या एका वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यावेळी त्याने महिला पोलीस अधिकाऱ्याचा पती असल्याचा दिखावा करून उलट बंदोबस्तावरील दुय्यम दर्जाच्या अधिकाऱ्यांशी व पोलिसांशी हुज्जत घातली. संतप्त पोलिसांनी त्याला कारवाईसाठी पोलीस ठाण्यात आणले. त्याने पोलीस ठाण्यातही धिंगाणा घालून अधिकाऱ्यांना व पोलीस कर्मचाऱ्यांना अर्वाच्च व अरेरावीची भाषा वापरली. त्यामुळे परिसरात गोंधळाचे तसेच तणावाचे वातावरण झाले. काहीवेळात त्याची पत्नी संबंधित महिला पोलीस अधिकारीही त्या ठिकाणी आल्या, त्यांनीही प्रथम पतीच्या कृत्याला साथ देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पतीचा आवाज चांगलाच वाढला नंतर प्रकरण अंगलट येणार असल्याचे लक्षात आल्यानंतर महिला अधिकाऱ्याने पवित्रा बदलत मवाळ भूमिका घेतली. या प्रकरणामुळे पोलीस व गृहरक्षक दलातील कर्मचाऱ्यांतून नाराजीचा सूर उमटला. रात्री उशिरापर्यंत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला नव्हता, पण याची चर्चा शहरातील पोलीस वर्तुळात सुरू होती.