बेळगावात फेसबुक फ्रेंडच्या मदतीने पत्नीकडून पतीचा खून, पाचजणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 12:04 IST2024-10-18T12:03:38+5:302024-10-18T12:04:36+5:30
व्यावसायिकाच्या मृत्यूचे गूढ

बेळगावात फेसबुक फ्रेंडच्या मदतीने पत्नीकडून पतीचा खून, पाचजणांना अटक
बेळगाव : रिअल इस्टेट व्यावसायिक संतोष दुंडाप्पा पद्मण्णावर (वय ४६, रा. अंजनेयनगर) यांचा मृत्यू नैसर्गिक नसून त्यांच्या पत्नीनेच फेसबुक फ्रेंडच्या मदतीने खून केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी संतोष यांच्या पत्नीसह पाचजणांना अटक केली आहे.
संतोषची मुलगी संजना हिने दिलेल्या फिर्यादीवरून पत्नी उमा, तिचा फेसबुक फ्रेंड शोभित गौडा, कामगार नंदा कुरिया, प्रकाश कुरिया व एक अनोळखी अशा एकूण पाचजणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. या सर्व आरोपींची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे.
बुधवारी (दि.९) सायंकाळी संतोष यांचा खून करून हृदयाघाताने मृत्यू झाल्याचे भासविण्यात आले असल्याचा आरोप संतोष यांच्या मुलीने केला होता. शवचिकित्सा अहवाल उपलब्ध झाल्यानंतर यासंबंधीची अधिक माहिती उजेडात आली असता संतोष यांच्या पत्नीने झोपेच्या गोळ्या देऊन मारल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. या प्रकरणी बुधवारी रात्री माळमारुती पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली होती. बंगळुरूस्थित शोभित गौडा आणि आणखी एका आरोपीला पोलिसांनी हुबळी येथे अटक करण्यात आली.