झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात घातला घण ; पतीस जन्मठेप

By उद्धव गोडसे | Published: November 7, 2023 07:17 PM2023-11-07T19:17:03+5:302023-11-07T19:17:21+5:30

माले येथील खून खटल्याचा निकाल, सप्टेंबर २०२० मधील खुनाची घटना

husband killed wife, Life imprisonment for husband | झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात घातला घण ; पतीस जन्मठेप

झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात घातला घण ; पतीस जन्मठेप

उद्धव गोडसे

कोल्हापूर : पत्नीला कमी ऐकू येत असल्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात लोखंडी घण घालून पतीने तिचा निर्घृण खून केला होता. सप्टेंबर २०२० मध्ये माले (ता. पन्हाळा) येथे झालेल्या खूनप्रकरणी पती दत्तात्रय आनंदा पाटील (वय ३७, रा. माले) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश (२) एस. आर. साळोखे यांनी मंगळवारी (दि. ७) झालेल्या सुनावणीत दोषी ठरवून जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिन्यांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली.

सरकारी वकील मंजुषा पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय पाटील याची पत्नी शुभांगी यांना कमी ऐकू येत होते. यावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वादाचे खटके उडत होते. २४ सप्टेंबर २०२० रोजी रात्री दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर दत्तात्रय घरात बेडवर झोपला होता, तर त्याची पत्नी शुभांगी दोन मुलांसह खाली झोपल्या होत्या. दुस-या दिवशी सकाळी सव्वासहाच्या सुमारास दत्तात्रय याने झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात लोखंडी घण घालून तिचा निर्घृण खून केला. हा प्रकार त्याच्या दोन्ही मुलांनी पाहिला होता. मुलांनी काही अंतरावरील दुस-या घरात राहणारे आजी-आजोबा आणि शेजा-यांना घटनेची माहिती दिली. पोलिस पाटील सुवर्णा सुभाष हिरवे (वय ४२, रा. माले) यांनी कोडोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक सूरज बनसोडे यांनी गुन्ह्याचा तपास करून संशयितावर न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सरकारी वकील पाटील यांनी २१ साक्षीदार तपासले. मृत शुभांगी यांची आई, दोन्ही मुले आणि इतर नातेवाईकांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सरकारी वकिलांचा युक्तीवाद आणि साक्षी ग्राह्य धरून न्यायाधीशांनी आरोपीस दोषी ठरवून शिक्षा सुनावली. पोलिस उपनिरीक्षक एस. ए. कोळी आणि कॉन्स्टेबल रोहिणी खोत यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम केले.

Web Title: husband killed wife, Life imprisonment for husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.