पत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात हजर
By admin | Published: May 13, 2014 12:47 AM2014-05-13T00:47:03+5:302014-05-13T00:47:03+5:30
जयसिंगपुरातील घटना : अनैतिक संबंधाच्या संशयातून डोक्यावर सळईने वार
जयसिंगपूर : अनैतिक संबंधाच्या संशयावरून डोक्यात लोखंडी सळईने वार करून पत्नीचा निर्घृण खून करून पती स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर होण्याचा प्रकार आज (सोमवार) घडला. सुजाता ऊर्फ विजया संतोष सावंत (वय ३२, मूळ रा. कोल्हापूर, सध्या रा. इंदिरानगर झोपडपट्टी, जयसिंगपूर) असे मृत महिलेचे नाव आहे, तर संतोष रामचंद्र सावंत (३५. रा. नाना पाटीलनगर, कोल्हापूर) असे तिच्या पतीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : चौदा वर्षांपूर्वी सुजाता हिचा संतोष सावंत याच्याशी विवाह झाला होता. संतोष हा जेसीबी वाहनावर चालक म्हणून काम करतो. त्यांना ओंकार (१३), प्रणव (१०) अशी दोन मुले आहेत. चालक असल्याने संतोष नेहमी बाहेरगावी असायचा, दरम्यान कुरुंदवाडमधील एका व्यक्तीशी सुजाता हिचे सहा वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचा संशय संतोषला होता. त्यावरुन दोघांत वाद होत होता. सहा महिन्यांपूर्वी सुजाता ही प्रियकरासोबत बेपत्ता झाल्याची तक्रार संतोषने कुरुंदवाड पोलिसांत दिली होती. या घटनेनंतर सुजाता व संतोष यांच्यात समेट झाला होता. तीन दिवसांपूर्वी जयसिंगपूर येथील इंदिरानगर झोपडपट्टीमधील सोमनाथ जाधव यांच्या घरी तो भाड्याने राहायला आला होता. दरम्यान, काल (रविवार) रात्री संतोष व सुजाता यांच्यात पुन्हा वाद झाला. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास सुजाता झोपली असताना संतोषाने चिडून लोखंडी सळीने डोक्यात वार करून तिचा खून केला. आज सकाळी घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक प्रकाश घारगे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष डोके, पोलीस उपनिरीक्षक गणेश लोकरे, शाम कदम यांच्यासह पोलीस कर्मचारी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा केला. याबाबतची फिर्याद सुजाताची आई मीना बळवंत ताबरे (४६, रा. झारी मशिदीच्या मागे, कुरुंदवाड)हिने जयसिंगपूर पोलीस ठाण्यात दिली. संशयित पोलिसांत हजर डोक्यात वार केल्यानंतर सुजाता गंभीर जखमी झाली. मोठा रक्तस्राव झाल्याने ती मृत झाली. पहाटे चार वाजता संतोष घरातून बाहेर पडला. प्रथम कुरुंदवाडला जाण्यासाठी बसस्थानकावर आला होता; मात्र बस नसल्याने त्याने कोल्हापूर गाठले. त्यानंतर सकाळी परत तो कुरुंदवाड पोलिसांत हजर होऊन पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. कुरुंदवाड पोलिसांनी जयसिंगपूर पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. घटनास्थळी संशयिताला आणण्यात आले होते. त्याच्या चेहर्यावर कोणताही लवलेश नव्हता.