Kolhapur: भांडणात पतीकडून पत्नीचा गळा आवळून खून, पती फरार; इचलकरंजीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 12:17 PM2024-06-19T12:17:29+5:302024-06-19T12:17:49+5:30
विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न
इचलकरंजी : येथील संग्राम चौक परिसरात पतीने बेदम मारहाण करून पत्नीचा गळा आवळून खून केला. करिश्मा किसन गोसावी (वय २५) असे मृताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. कौटुंबिक वादातून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. खुनानंतर चादरीमध्ये मृतदेह झाकून तो विल्हेवाट लावण्यासाठी नेण्याचा प्रयत्न केला असावा, असा अंदाज घटनास्थळावरून पोलिसांनी वर्तवला.
संग्राम चौकातील खासगी क्लासजवळ किसन हा पत्नी करिश्मा व तीन मुलांसोबत भाड्याच्या घरात दोन महिन्यांपूर्वीपासून राहत होता. या पती-पत्नीमध्ये वारंवार भांडण होत होते. सोमवारी रात्रीही त्यांच्यात जोरदार भांडण झाले. त्यावेळी किसन याने करिश्माला मारहाण केल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. मंगळवारी किसन हा घराचा दरवाजा झाकून आतच बसत होता. त्याची दोन मुले मामा आकाश व नातेवाइकांकडून दोन वेळा घरी आली होती. त्यांनाही किसन याने घरात न घेता बाहेरूनच परत नातेवाइकांकडे पाठविले. दुपारनंतर किसन याने घराला कुलूप लावून पलायन केले.
दरम्यान, दिवसभरात करिश्मा एकदाही घरी न आल्याने नातेवाइकांनी तिच्या घराकडे धाव घेतली. त्यावेळी घराला कुलूप होते. करिश्मा न आढळल्याने नातेवाइकांनी घराचे कुलूप तोडून आत पाहिले असता त्यांना करिश्माचा मृतदेह आढळला.
याबाबत शिवाजीनगर पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता करिश्माला बेदम मारहाण करून किसन याने गळा आवळून खून केला असावा, असा अंदाज आला. नागरिकांसह नातेवाइकांनी घटनास्थळी गर्दी केली. गर्दीतून कसरत करत पोलिसांनी पंचनामा केला. मृतदेह विच्छेदनासाठी आयजीएम रुग्णालयात नेला. तेथेही नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत मोठी गर्दी केली होती. या घटनेमुळे नातेवाइकांनी मोठा आक्रोश केला.
विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न
घटनास्थळावर आढळलेला मृतदेह चादरी व कपड्यांमध्ये झाकला होता. किसन दिवसभरातून वेळोवेळी घरातून बाहेर डोकावून पाहत होता आणि पुन्हा दरवाजा लावत होता. दाट लोकवस्तीचा भाग असल्याने नागरिकांनाही त्याच्या कृत्याचा संशय आला होता. पोलिसांनी परिसरातील एका सीसीटीव्हीची तपासणी केली. त्यामध्ये पहाटेच्या सुमारास किसन याने भंगार गोळा करण्याचा ढकलगाडा दारात आणून त्यावर काही बॉक्स ठेवल्याचे दिसून आले. त्यामुळे त्या गाड्यावरून नेऊन मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.
पथके रवाना
किसन याने दुपारनंतर पलायन केले. त्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दोन पथके रवाना केली आहेत.
तीन मुले पोरकी
गोसावी यांना तीन मुले आहेत. त्यांतील एक मुलगा शिक्षणासाठी बाहेर आहे. दोन मुले त्यांच्यासोबत राहतात. ते बऱ्याच वेळा शेजारी राहणाऱ्या मामाकडेही जात असतात. आईचा मृत्यू आणि वडील फरार झाल्याने ही तिन्ही मुले पोरकी झाली आहेत.