पत्नीच्या डोक्यात दगड घालून पतीची आत्महत्या
By admin | Published: November 2, 2016 01:23 AM2016-11-02T01:23:00+5:302016-11-02T01:23:00+5:30
पत्नी गंभीर : वडणगेतील घटना
वडणगे : वडणगे (ता. करवीर) येथे एका मजुराने पत्नीच्या डोक्यात दगड घालून स्वत: राहत्या घरी गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. विठ्ठल धावडू चव्हाण (वय ४२, सध्या रा. इंदिरानगर, वडणगे, मूळ गाव अरुर, ता. इंडी, जि. विजापूर) असे त्याचे नाव आहे. यामध्ये त्याची पत्नी सुशीला विठ्ठल चव्हाण (३७) गंभीर जखमी झालेली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. घटनेचा पंचनामा करवीर पोलिसांनी केला.
समजलेली माहिती अशी, येथील पंडित ऊर्फ पोपट जाधव यांच्याकडे विठ्ठल चव्हाण ट्रॅक्टर-ट्रॉलीवर मजूर म्हणून काम करत होता. वडणगे-निगवे रस्त्यावर बांधलेल्या खोल्यांमध्ये चव्हाण पती-पत्नी राहत होते. चव्हाण यांना दारूचे व्यसन होते. गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होता.
मंगळवारी सकाळी भाऊबिजेसाठी सुशीलाचा भाऊ आला होता. दरवाजा ढकलल्याबरोबर त्यांना बहीण रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत पडलेली आणि विठ्ठल याने गळफास लावून घेतल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ पंडित ऊर्फ पोपट जाधव यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पोलिसपाटील शिवाजी सुतार यांना कळविले. शिवाजी सुतार यांनी करवीर पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी पंचनामा केला. जखमी अवस्थेतील सुशीला यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. विठ्ठल यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कोल्हापूर येथील सीपीआरमध्ये नेण्यात आला.
सुशीला चव्हाण यांना अरूरला नेले
वडणगे (ता. करवीर) येथे पतीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सुशीला विठ्ठल चव्हाण यांना पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयातून अरूर (ता. इंडी, जि. विजापूर) या ठिकाणी त्यांचा भाऊ शेडजी उमलू राठोड (सध्या राहणार आंबेडकरनगर, नागाव, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांनी मंगळवारी सायंकाळी नेले. याबाबतची माहिती करवीर पोलिस निरीक्षक दिलीप जाधव यांनी पत्रकारांना दिली.