हुश्श्य...मानधन वाढ मिळाली एकदाची..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:27 AM2021-08-28T04:27:37+5:302021-08-28T04:27:37+5:30

कोल्हापूर : मिळणार, मिळणार म्हणून आंदोलने, पत्रव्यवहार, प्रतीक्षा आदी सगळे सरकारी सोपस्कार पूर्ण केल्यानंतर अखेर आशा, गटप्रवर्तकांना शासनाने जाहीर ...

Hushshya ... Once the honorarium is increased ..! | हुश्श्य...मानधन वाढ मिळाली एकदाची..!

हुश्श्य...मानधन वाढ मिळाली एकदाची..!

Next

कोल्हापूर : मिळणार, मिळणार म्हणून आंदोलने, पत्रव्यवहार, प्रतीक्षा आदी सगळे सरकारी सोपस्कार पूर्ण केल्यानंतर अखेर आशा, गटप्रवर्तकांना शासनाने जाहीर केलेले वाढीव मानधन पदरात पडण्याचा मार्ग माेकळा झाला आहे. वाढीव मानधनासह कोविड भत्तादेखील मिळणार असल्याने आशा, गटप्रवर्तकांचे चेहरे फुलले असून, त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

कोरोना काळात काम वाढल्याने मानधनात वाढ करावी, अशी मागणी आशा कर्मचारी संघटनेने लावून धरली होती. ऐन कोरोनाच्या साथीत कामावर बहिष्कारही टाकला होता, पण नुसती चालढकल करण्यापलीकडे शासनाकडून काहीही झाले नाही. मागील महिन्यात मानधन वाढीची घोषणा केली होती; पण प्रत्यक्षात जीआर काढला नसल्याने लाभ देता येत नव्हता. गुरुवारी शासनाने हा जीआर काढल्याने आशा, गटप्रवर्तकांचा जीव भांड्यात पडला.

आता नव्या मानधनवाढ धोरणानुसार आशा व गटप्रवर्तकांना कोविड भत्ता म्हणून दरमहा एक हजार रुपये जास्तीचे मिळणार आहेत. कोविड साथ संपल्यानंतर तो बंद होणार आहे. पण याचवेळी इतर मानधनातही वाढ केल्याने कधी नव्हे या कर्मचाऱ्यांचे मानधन आता दहा हजाराच्या आसपास जाणार आहे. आता गटप्रवर्तकांना १२ हजार रुपये व आशांना ८ हजार रुपये मानधन मिळणार आहे. सर्व्हेची कामे वाढतील तशी या मानधनाच्या रकमेत वाढ होणार असल्याने ग्रामीण आरोग्य यंत्रणेचा कणा असणाऱ्या आशा व गटप्रवर्तकांना चांगले दिवस येणार आहेत.

प्रतिक्रिया

बऱ्याच दिवसांच्या संघर्षानंतर मानधन मिळाल्याचा वेगळाच आनंद मिळत आहे. आम्ही गावपातळीवर आरोग्यासाठी करत असलेल्या कामाच्या तुलनेत मिळणारा मोबदला खूपच तोकडा व कुटुंबाच्या उदरनिर्वाहापुरतादेखील नसल्याने आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवला.

सुप्रिया गुदले, गटप्रवर्तक

Web Title: Hushshya ... Once the honorarium is increased ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.