सूत्रधार शोधल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : हसन मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 12:29 AM2018-05-12T00:29:09+5:302018-05-12T00:29:09+5:30
कागल : कागल नगरपालिका इमारतीला आग लागण्याची घटना अत्यंत दुर्दैवी होती. कोणाला तरी बदनाम करण्याच्या हेतूने ही आग लावली गेली. ज्याने हे कृत्य केले त्याच्यापर्यंत कागल पोलीस पोहोचले. या आरोपीच्या आणि घटनेच्या मागचा सूत्रधार कोण...? याचा शोध पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील घेत होते. हा तपास अंतिम टप्प्यात आला असतानाच त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. हा प्रकार संशयास्पद आहे. त्यामुळे नगरपालिका इमारतीला आग लावणाऱ्या खºया सूत्रधाराचा शोध लागल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा आमदार हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी दिला.
आगीच्या घटनेत जळालेल्या कागल नगरपालिका इमारतीच्या पुनर्बांधणीचा प्रारंभ शुक्रवारी शहरातील सर्व समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर झालेल्या समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष माणिक माळी होत्या. यावेळी मुख्याधिकारी टीना गवळी, युवराज पाटील, प्रकाश गाडेकर, रमेश तोडकर, प्रवीणसिंह भोसले, चंद्रकांत गवळी, संजय चितारी, नितीन दिंडे, ज्येष्ठ नागरिक व्ही. आर. देशपांडे, पी. बी. घाटगे, प्रभाकर बन्ने, शामराव पाटील, आदी मान्यवर हजर होते.
आपल्या भाषणात आ. मुश्रीफ पुढे म्हणाले की, नगरपालिकेची देखणी इमारत जाळली. तपासी अधिकारी बदलला म्हणून हा तपास थांबणार नाही. आम्ही पाठपुरावा सोडणार नाही. पूर्वीच्यापेक्षाही देखणी इमारत उभी करू. नगरपालिकेच्या माध्यमातून सर्व रस्ते डांबरीकरण केले आहेत. शहरात रमाई आवास योजनेतून २५४ लोकांना प्रत्येकी अडीच लाख रुपये मंजूर झाले आहेत. नवीन घरकुलांचे वाटपही लवकरच करणार आहोत. यावेळी बोलताना जिल्हा बँकेचे संचालक भैया माने म्हणाले की, नगरपालिका इमारत आगीच्या विषयावर काहींनी गैरसमज पसरविले. गावभर चर्चा झाल्या.
आमदार मुश्रीफ यांनी या घटनेचा तपास लवकर लावावा यासाठी तर प्रयत्न केलेच. पण जळालेली इमारत नव्याने उभारणीसाठी मुख्यमंत्र्यांकडून निधी मंजूर करून आणला आहे. स्वागत उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर यांनी, तर आभार सौरभ पाटील यांनी मानले. कार्यक्रमास सर्व नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.
म्हणून पाऊस. ....
हा कार्यक्रम सुरू होण्याआधीच पाऊस सुरू होता. अशा पावसातच भाषणे झाली. याचा संदर्भ घेत आमदार मुश्रीफ म्हणाले की, नगरपालिका इमारतीला पुन्हा आग लागू नये आणि लागलीच तर ती विझून जाईल हे सांगण्यासाठी पावसानेही हजेरी लावली आहे. विघ्नसंतोषी लोकांना नियतीचा हा संदेश आहे.
समरजितसिंह घाटगेंना इशारा अन् विनंती...
आमदार मुश्रीफ म्हणाले की, नगरपालिकेने शासनाकडे मागितलेली जागा पुणे ‘म्हाडा’ने घेतली आहे. तेथे घरकुले बांधली जाणार आहेत. पण यासाठी केवळ एकच अर्ज आला आहे. कारण हे घरकुल दहा लाखाला कोण घेणार? आणि आम्ही कागलच्या बाहेरील कोणाला येथे येऊही देणार नाही. माझी समरजित घाटगेंना विनंती आहे की, त्यांनी ही जागा नगरपालिकेकडे सुपूर्द करावी. आम्ही तेथे चार पाच हजार घरे बांधून दाखवितो. तीही अगदी अल्प किमतीत.