हसूर दुमाला पंचक्रोशीत कोरोनाचा कहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:26 AM2021-05-11T04:26:18+5:302021-05-11T04:26:18+5:30
म्हालसवडे : करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील हसूर दुमाला परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. या परिसरात ...
म्हालसवडे : करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील हसूर दुमाला परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. या परिसरात लसीकरणही अगदी मर्यादित प्रमाणात झाले असून, रुग्णसंख्या वाढू लागल्याने कुरुकली येथे कोविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी होत आहे .
हसूर दुमाला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या या पंचक्रोशीतील गावांमध्ये आजअखेर ७८ लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यापैकी सडोली खालसा, हळदी, कारभारवाडी व कुरुकली येथील चौघाजणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर बाधित १० रुग्णांवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असून, २२ रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. बाकीचे गृहविलगीकरण कक्षात आहेत.
हसूर दुमाला प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत कांडगाव, हळदी, कुरुकली व हसूर दुमाला येथे रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आल्या आहेत. सध्या कांचनवाडी, हसूर दुमाला, सडोली खालसा, देवाळे, बेले येथे रुग्णांची संख्या वाढू लागली असून, सर्वाधिक कुरुकली येथे १२ व कांडगाव येथे १४ कोरोनाचे रुग्ण झाले आहेत, अशी माहिती हसूर दुमाला प्राथमिक आरोग्य केंद्राकडून देण्यात आली आहे. येथील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. टी. पोळ यांनी या रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांनी तपासणी करून घेण्याचे व विलगीकरण कक्षात राहण्याचे आवाहन केले आहे.