मी माजी आमदार, विधानसभेतील घटनावर माझ्या भूमिकेला महत्त्व नाही - चंद्रदीप नरके
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 12:00 PM2022-06-24T12:00:27+5:302022-06-24T12:00:57+5:30
माजी आमदार, राज्य नियोजन अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आणि इतर माजी आमदारांचे काय याबाबत उत्सुकता निर्माण झाली.
कोपार्डे (कोल्हापूर) : मी माजी आमदार. विधानसभेतील घटनावर माझ्या भूमिकेला महत्त्व नाही. आज माझ्या जवळच्या नातेवाईकाचा अपघाती मृत्यू झाला असून मी तिकडे निघालो असल्याचे करवीरचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितले. आपण कोणत्या बाजूला राहणार याबाबत त्यांनी बोलण्याचे टाळल्याने शिवसेनेतील बंडाळीचा मोठा दबाव माजी आमदारांच्यावर असल्याचे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट दिसत होते.
गेल्या चार दिवसापासून शिवसेनेत चाललेली बंडाळीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील शिवसेनेचे माजी आमदार गोव्यात एकत्र असल्याने तर्कवितर्क सुरू होते. प्रथम सावध भूमिका घेत सर्वांनी याबाबत आपल्याला काहीही कल्पना नसल्याचे जाहीर केले. पण आज माजी आमदार व राज्य नियोजन अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आणि इतर माजी आमदारांचे काय याबाबत उत्सुकता निर्माण झाली.
आज याबाबत करवीरचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्याशी संपर्क साधला असता मी माजी आमदार आहे. विधानसभेच्या राजकीय घडामोडीत आमच्या भूमिकेला महत्त्व नाही असे सांगितले. शिवसेनेबरोबर की एकनाथ शिंदे गटाबरोबर जाणार असे विचारले असता माझ्या जवळच्या नातेवाईकांचा अपघाती मृत्यू झाला आहे मी तिकडे निघालो आहे असे सांगितले. यामुळे या बंडाळीचा भावनिक व राजकीय दबाव निर्माण झाल्याचे त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत होते.
शिवसेनेने चंद्रदीप नरके यांना मागील टर्म विधानसभेची उमेदवारी देवून विधानसभेत पाठवले. २०२० च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला. पण निवडणुकीनंतर मविआ सरकार सत्तेत आले आणि शिवसेना कार्यकर्त्यांची मोठी घुसमट सुरू झाली होती. जिल्ह्यातील इतर पाच शिवसेनेच्या पराभूत आमदारांची हीच अवस्था होती. विशेषतः जे पराभूत झाले त्यांचे कट्टर विरोधक काँग्रेसच होती.