पोलीस अधिकारी म्हणून आला, घरात ठिय्या मारून राहिला; पुण्यातील एकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 11:21 AM2022-04-18T11:21:48+5:302022-04-18T11:24:24+5:30
मोठा पोलीस अधिकारी असल्याचे भासवून जबरदस्तीने त्यांच्या शाहूपुरीतील घरात दि. २४ ते २७ मार्च असे तीन दिवस राहिला. त्याने ‘मी पोलीस अधिकारी आहे, माझे ऐकले नाही तर मी तुझ्यावर खोटी कारवाई करेन’, अशी वेळोवेळी धमकी दिली.
कोल्हापूर : पोलीस अधिकारी असल्याचे भासवून तोतयाने जबरदस्तीने घरात ठिय्या मारला, खोटी कारवाईची धमकी देऊन त्याच घरात तीन दिवस फुक्कट जेवून त्यांच्याच रिक्षातून फुकट प्रवास करून आर्थिक नुकसान केले. त्याप्रकरणी पुण्यातील एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आली आहे. अमित जगन्नाथ कांबळे (३५, रा. निंबाळकर वाडा, नवी पेठ, पुणे) असे गुन्हा नोंद झालेल्या तोतया पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शाहूपुरी सहाव्या गल्लीत महावीर परिसा अक्कोळे (६०) हे रिक्षाचालक राहतात. संशयित अमित कांबळे याने आपण मोठा पोलीस अधिकारी असल्याचे भासवून जबरदस्तीने त्यांच्या शाहूपुरीतील घरात दि. २४ ते २७ मार्च असे तीन दिवस राहिला. त्याने ‘मी पोलीस अधिकारी आहे, माझे ऐकले नाही तर मी तुझ्यावर खोटी कारवाई करेन’, अशी वेळोवेळी धमकी दिली. तसेच त्या तीन दिवसात त्या तोतयाने अक्कोळे यांच्या रिक्षातून फुक्कट प्रवास केला. घरात राहून फुक्कट जेवून आर्थिक नुकसान केेले.
त्याने जबरदस्तीने अक्कोळे यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या बँक खाते, पासबुक वापरून नागरिकांच्या रकमा वर्ग (ट्रान्सफर) केल्या. त्यानंतर एटीएमच्या आधारे त्याने वर्ग केलेल्या रकमा काढून घेऊन इतर नागरिकांचीही फसवणूक केली. अक्कोळे यांच्या घरात मास, मद्य प्राशन करून धार्मिक भावना दुखावल्या. अशा पद्धतीची तक्रार महावीर अक्कोळे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार अमित कांबळे याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.