लाभासाठी गुरु बदलणारा मी नाही, समरजित घाटगेंचा मुश्रीफांना टोला

By विश्वास पाटील | Published: July 6, 2023 01:20 PM2023-07-06T13:20:57+5:302023-07-06T13:41:53+5:30

'आगामी निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही माझ्या प्रचारात असतील'

I am not one to change the Guru for profit, Samarjit Ghatge criticism of Hasan Mushrif | लाभासाठी गुरु बदलणारा मी नाही, समरजित घाटगेंचा मुश्रीफांना टोला

लाभासाठी गुरु बदलणारा मी नाही, समरजित घाटगेंचा मुश्रीफांना टोला

googlenewsNext

कोल्हापूर : मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्यामुळे कोण तरी बुद्रूक साठी मी भाजप सोडणार नाही. कारण मी पक्षाचा खुर्द कार्यकर्ता आहे अशा शब्दात भाजपचे जिल्हाध्यक्ष व कागलच्या शाहू सहकार समुहाचे नेते समरजित घाटगे यांनी गुरुवारी आपली राजकीय दिशा स्पष्ट केली. मेळाव्यात त्यांनी मुश्रीफ यांना मला भाजपमधून बाहेर घालवायची घाई झाली असल्याची टीका केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मी स्वागत आणि अभिनंदन करतो कारण त्यांच्यामुळे आगामी निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेही माझ्या प्रचारात असतील असे सांगून त्यांनी विधानसभा निवडणूकीचे रणशिंगही फुंकले. विक्रमी मतांनी विजयी होणार असाही विश्र्वास त्यांनी व्यक्त केला. कागलच्या गैबी चौकात त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेवून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. व्यासपीठावर भाजपचे चिन्ह, झेंडा कांहीच नसल्याने लोकांना सुरुवातीला कुतूहल वाटले. परंतू घाटगे यांनी गळ्यात भाजपचा कमळ चिन्ह असलेला स्कार्फ घालून हीच माझी राजकीय भूमिका असल्याचे जाहीर करताच जोरदार टाळ्या, शिट्यांचा गजर झाला.

आमच्या रक्तात तसे संस्कार नाहीत 

समरजित म्हणाले, राजकारणात व व्यक्तिगत जीवनातही गुरुला वंदन करणारा मी कार्यकर्ता आहे. माझे वडिल विक्रमसिंह घाटगे यांचे स्वर्गीय वसंतदादा पाटील व यशवंतराव मोहिते हे राजकीय गुरु होते. मोहिते यांच्यामुळेच शाहू कारखान्याला परवाना मिळाला. वडिल हेच माझे सर्वार्थाने जीवनाचे गुरु. परंतू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे राजकीय गुरु. काहीतरी लाभासाठी गुरु बदलणारा मी नाही. कारण आमच्या रक्तात तसे संस्कार नाहीत. मी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत साहेबांना सोडणार नाही असे म्हणणाऱ्यांनी आजपर्यंत किती गुरु बदलले याचा हिशोब नाही.

मला भाजपमधून बाहेर घालवायची घाई 

बदललेल्या राजकीय स्थितीत नेमकी काय भूमिका घ्यायची याबद्दल संभ्रमात असल्याने दोन दिवस कार्यकर्त्यापासून व माध्यमापासून बाजूला राहिलो. त्याबद्दल तुम्हा सर्वांची मी माफी मागतो. कारण राजकारणात असलो तरी धांदात खोटं बोलण्याची सवय मला अजून लागलेली नाही. या दोन दिवसांत राज्यभरातील सगळ्या पक्षांच्या प्रमुखांचे फोन मला आले. ते फोन त्यांना कुणी करायला लावले ते पण माहित आहे. कारण त्यांना मला भाजपमधून लवकर बाहेर घालवायची घाई झाली आहे असा टोला घाटगे यांनी मुश्रीफ यांना लगावला.

Web Title: I am not one to change the Guru for profit, Samarjit Ghatge criticism of Hasan Mushrif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.