टोलप्रश्न सोडविण्यात मला ‘अत्यानंदच’
By admin | Published: September 16, 2014 12:51 AM2014-09-16T00:51:01+5:302014-09-16T23:51:57+5:30
शरद पवार यांची भूमिका : पण, त्यासाठी आमचे सरकार यायला हवे
कोल्हापूर : बारामतीचा टोल रद्द झाला, कारण त्यांनी संबंधित रस्ते विकास कंपनीला नगरपालिकेच्या मालकीची २० एकर जागा दिली. जे रस्ते नगरपालिका अथवा महापालिकेने स्वत: ठराव करून केले आहेत, त्या रस्त्यांच्या खर्चाचे उत्तरदायित्व त्यांच्यावरच येते. त्यामुळे तसा काय तोडगा कोल्हापूरच्या टोलप्रश्नी काढता येईल का, याचा विचार जरूर करता येईल. या प्रश्नी लक्ष द्यायला मला आनंदच वाटेल. परंतु, त्यासाठी आमचे सरकार येऊन तसा अधिकार मिळाला तर अत्यानंद वाटेल, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज, सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना मांडली.
टोलप्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेसने फारसे लक्ष दिले नाही. जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ यांनी टोल पंचगंगा नदीत बुडविण्याची घोषणा केली; परंतु तो रद्द झालेला नाही. याबद्दल लोकांत नाराजी असून, त्यांनी आंदोलन सुरू केले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले असता पवार म्हणाले, ‘टोलविरोधी कृती समितीचे निवेदन दोनच दिवसांपूर्वी मला फॅक्सवर मिळाले. यापूर्वीही मी कोल्हापुरात बऱ्याचवेळा आलो. परंतु, या प्रश्नासंबंधी कृती समितीच्या प्रतिनिधींनी माझ्याशी चर्चा केलेली नाही. त्यावेळी मी केंद्र सरकारच्या सत्तेत होतो, आता कुठेच नाही. तरीही कोणत्याही प्रश्नांची दखल घेण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यानुसार मी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना या टोलप्रश्नी माहिती देण्याची विनंती केली होती. त्यांनी आचारसंहिता संपल्यावरच याबाबत चर्चा करता येईल, असे सांगितल्याने आता काहीच करता येणार नाही. आचारसंहिता संपल्यावर कृती समितीच्या प्रतिनिधींशी चर्चा करून या प्रश्नी तोडगा काढण्यात मलाही आनंदच वाटेल. त्यातही सरकार आमच्या पक्षाचे आल्यास अत्यानंदच वाटेल. एखाद्या प्रश्नाबद्दलचे समज-गैरसमज फार दिवस टिकत नाहीत. ते सोडवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. त्यानुसार मुश्रीफ यांनी काही प्रयत्न केले. या प्रश्नाची सोडवणूक करायची झाल्यास सगळीच जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी, अशी भूमिका घेता येणार नाही. ज्यांनी हा टोल बसविला, त्यांना त्याचे उत्तरदायित्व स्वीकारावे लागेल.’ (प्रतिनिधी)
टोलप्रश्नी बोलण्याचा पवार यांना अधिकार नाही : मंडलिक
बारामती टोल रद्द केला, आता कोल्हापुरात मते मागू नका
कोल्हापूर : बारामती शहरांतर्गत टोलवसुली शरद पवार यांनी तत्काळ बंद केली. मात्र, कोल्हापूरच्या जनतेचा गेली साडेतीन वर्षे टोल विरोधात सुरू असलेला संघर्ष कसा दिसला नाही, असा सवाल माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी पत्रकाद्वारे उपस्थित केला आहे. महिनाभरापूर्वी मिळालेल्या खात्यातही जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ यांनी घोटाळा केल्याचा गंभीर आरोप मंडलिक यांनी पत्रकात केला.कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेला फसविण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी करू नये. त्यांचा ढोंगीपणा कोल्हापूरकर आता खपवून घेणार नाहीत. राज्यकर्त्यांविरोधात असलेला असंतोष येत्या निवडणुकीत उफाळून येईल. आघाडी सरकारला घरी बसविल्याखेरीज जनता स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही मंडलिक यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)