मी पानसरे, आम्ही सारेच पानसरे...
By admin | Published: February 19, 2015 12:19 AM2015-02-19T00:19:49+5:302015-02-19T00:21:08+5:30
चळवळ ददडपण्याचा प्रयत्न: शिंदे
कोल्हापूर : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय नेते अॅड. गोविंदराव पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता गोळ्या झाडून खुनी हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर बुधवारीही विविध संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी निषेध व्यक्त करत हल्लेखोरांना तातडीने अटक करण्याची तसेच मास्टर मार्इंड शोधण्याची मागणी केली. त्यासाठी कोल्हापूरसह आजरा, उचगाव, गडहिंग्लज आदी ठिकाणी मोर्चा, निषेध फेरी, रास्ता रोको केला.
जिल्ह्यात निषेध सुरुच : मोर्चाद्वारे, बंद पुकारुन व्यक्त केल्या विविध संघटना, सामान्यानी तिव्र भावना
आजरा : अॅड. गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी आजरा तहसील कार्यालयावर कॉ. संपत देसाई, प्रा. राजाभाऊ शिरगुप्पे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास एस. डी. चव्हाण यांच्या हस्ते हार अर्पण करून मोर्चास सुरुवात झाली. मोर्चा आजरा तहसील कार्यालयासमोर आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.
प्रा. राजाभाऊ शिरगुप्पे म्हणाले, समाजातील अपप्रवृत्ती उघड्यावर आणू पाहणाऱ्यांवर हल्ले होत आहेत. सामान्य माणसांचा आवाज दाबण्याचा हा प्रकार आहे. येशू ख्रिस्त, महात्मा गांधी यांनी हातात शस्त्र न घेता वाईट प्रवृत्तींना जेरीस आणण्यात यश मिळविले हा इतिहास आहे. एका बंदुकीची गोळी शंभर नव्या कार्यकर्त्यांना जन्मास घालते हे विसरू नये. अॅड. पानसरे यांच्यावरील हल्ला म्हणजे पुरोगामी विचारांवर हल्ला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी शासनाचा निषेधही करण्यात आला. हल्लेखोरांना ताबडतोब अटक करावी व या हल्ल्यामागचा खरा सूत्रधार शोधून काढण्याची मागणी मोर्चातील वक्त्यांनी केली.
मोर्चामध्ये गोकुळ कर्मचारी संघटनेचे संजय सावंत, लोकशाहीवादी श्रमिक मुक्ती दलाचे कॉ. संजय तर्डेकर, आजरा तालुका पेन्शनर्स संघटनेचे शंकरराव शिंदे, जिल्हा मध्यवर्ती बँक कर्मचारी संघटनेच्या भैरवी सावंत, सर्व श्रमिक संघ व मोलकरीन संघटनेच्या अध्यक्षा प्रतिभा कांबळे, सुधीर देसाई, भीमराव पुंडपळ, बी. के. कांबळे, युवाशक्तीचे तालुकाध्यक्ष समीर चाँद, डॉ. नवनाथ शिंदे, रवी शेंडे, निवृत्ती कांबळे सहभागी झाले होते.
चळवळ ददडपण्याचा प्रयत्न: शिंदे
गडहिंग्लज : दाभोलकरांच्या खुनाच्या घटनेला दीड वर्षाचा काळ लोटला तरी सरकारला मारेकरी सापडत नाहीत. पानसरे दाम्पत्यावरही त्याच प्रवृत्तीकडून हल्ला झाला आहे. विवेकाची चळवळ दडपण्याचाच हा प्रकार आहे. शासनाने हल्लेखोरांना त्वरित पकडावे, अन्यथा पुरोगामी जनता शस्त्रे हातात घेईल, असा इशारा ज्येष्ठ समाजवादी नेते अॅड. श्रीपतराव शिंदे यांनी दिला.
कॉ. गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी कॉ. उमा पानसरे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ येथे काढण्यात आलेल्या सर्वपक्षीय निषेध फेरीत ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे, उज्ज्वला दळवी, पी. डी. पाटील यांचीही भाषणे झाली.
येथील एम. आर. हायस्कूलपासून फेरीला सुरुवात झाली. मोर्चा प्रांतकचेरीवर आल्यानंतर निषेध सभा झाली. त्यानंतर प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
निषेध फेरीत उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, विरोधी पक्षनेत्या प्रा. स्वाती कोरी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर, ‘अंनिस’चे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईटे, जिजाऊ बिग्रेडच्या जिल्हाध्यक्षा अलका भोईटे, बी. जी. काटे, अॅड. दशरथ दळवी, शिवाजीराव होडगे, एम. एल. चौगुले, गणपतराव पाटोळे व अरविंद बार्देस्कर, बाळासाहेब मुल्ला, मेहबूब सनदी, नगरसेवक दादू पाटील, कल्याणराव पुजारी, आशपाक मकानदार, अमृतराव देसाई, सदानंद वाली, युवराज बरगे, आप्पासाहेब कमलाकर, प्राचार्य श्रीरंग तांबे, जी. एस. शिंदे, रावसाहेब कोडोली, सिद्धार्थ बन्ने, प्रा. राम कांबळे, उर्मिला कदम, सुनंदा गुंडे, सुवर्णलता गोईलकर, इकबाल शायन्नावर, आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
उचगाव फेरीवाले संघटनेतर्फे बंद
‘स्मॅक’तर्फे निषेध
हिंदू जनजागरण समितीतर्फे निषेध