"पाटील आहे मी, मागून वार करत नाही", सतेज पाटलांचे आवाडेंना प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 12:38 PM2022-03-08T12:38:16+5:302022-03-08T12:39:35+5:30
Satej Patil : हातकणंगले तालुक्यातील तारदाळ सेवा संस्थेच्या नूतन इमारत उद्घाटन समारंभावेळी या दोघांमध्ये जोरदार जुगलबंदी रंगली.
कोल्हापूर : एकदा शत्रुत्व पत्करले की मी मागे-पुढे पाहत नाही, हे जिल्ह्याने अनुभवले आहे. ९६ कुळी मराठा, पाटील आहे मी. त्यामुळे जे करायचे ते समोरासमोर करतो. मागून वार करीत नाही, अशा शब्दांत पालकमंत्री सतेज पाटील यांनी आमदार प्रकाश आवाडे यांना रविवारी प्रत्युत्तर दिले.
हातकणंगले तालुक्यातील तारदाळ सेवा संस्थेच्या नूतन इमारत उद्घाटन समारंभावेळी या दोघांमध्ये जोरदार जुगलबंदी रंगली. माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या साक्षीने झालेल्या या टोलेबाजीला ग्रामस्थांनीही टाळ्यांच्या कडकडाटात, शिट्या वाजवीत प्रतिसाद दिला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, विजयसिंह माने, यशवंत वाणी, संजय चोपडे, सेवा संस्थेचे अध्यक्ष कुमार चौगुले, उपाध्यक्ष बापू गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात आमदार आवाडे यांनी जिल्हा बँकेतील पराभवाचा मुद्दा काढला. मदन कारंडे यांना उद्देशून ते म्हणाले, मदनराव जिल्हा बँकेत या सगळ्यांनी तुमचा आणि माझा कार्यक्रम केला आहे. वेळ येईल तेव्हा मी बघणार आहे. यावेळी सतेज पाटील यांनी खूण करून मी शेवटी बोलणार आहे असे आवाडे यांना सांगितले. त्यानंतरही आवाडे म्हणाले, असू दे की, केलाय ते केलाय. तुम्ही काय झाकून करायला नाही. आम्हीच त्यावेळी डोळं बंद करून लक्षात न घेता बसलो होतो. तुमचा दोष नाही. तो आमचा आहे. आम्हीच जरा कमी पडलो.
आवाडे यांच्या भाषणानंतर पालकमंत्री पाटील काय उत्तर देणार याची उत्सुकता ताणली होती. त्यामुळे ते बोलायला उभे राहताच जोरदार शिट्या वाजल्या. त्यांनीही मग कडक भाषेतच टोले लगावले. सतेज पाटील म्हणाले, केंद्रात भाजपाचे सरकार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही त्यांचेच सरकार येणार, असे प्रकाश अण्णांना वाटले. अण्णा आता तुम्हालाही फार बोलता येत नाही. कधी परत येशीला माहीत नाही, असे म्हटल्यावर राहुल नाराज झालाय; पण आता पाच वर्षे होईपर्यंत इलाज नाही. तेव्हा किती वर्षे माहिती नाही; पण सध्या तरी बाजूला आहे असे आवाडे म्हणाले. सार्वजनिक कामात मी कोणाला अडवत नाही. लहान वयात मोठा झालो. त्यामुळे अनेकांची अडचण होते; पण त्याला माझा नाइलाज आहे.
आमचं ठरलंय...करून दाखवलंय...
सतेज पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीत मी आमचं ठरलंय अशी भूमिका घेऊन मैदानात उतरलो. माझी विधानसभा निवडणूक त्यानंतर होती; पण मी माझ्या राजकारणाचा विचार केला नाही. घाबरलो नाही. उघडपणाने उतरलो आणि जे करायचं ते करून दाखवलं. त्यामुळे जे करायचं ते समोरासमोर.. पाठीमागे आम्ही काय करीत नाही.
...तर राजकारण सोडून घरी बसेन...
पालकमंत्री पाटील म्हणाले, कोणालाही वेगळी वागणूक न देता मी या जिल्ह्याचा सुपुत्र आहे याचा विचार करून सर्वांना न्याय देतो. मी पालकमंत्री झालो म्हणून ज्या दिवशी जिल्हा पश्चात्ताप करील त्या दिवशी राजकारण सोडून घरात बसेन.