‘तू माझा स्वाभिमान’ स्पर्धा उत्साहात
By admin | Published: December 22, 2016 12:58 AM2016-12-22T00:58:19+5:302016-12-22T00:58:19+5:30
‘कलर्स’ आणि ‘सखी मंच’तर्फे आयोजन : आई-मुलींच्या भावविश्वावर आधारित कार्यक्रम
कोल्हापूर : आई म्हणजे वात्सल्य, आई म्हणजे मायेची ऊब, संस्कारांची शिदोरी, कुटुंबाचा कणा, आयुष्यात लाभलेला पहिला गुरू, जिने आपल्याला चालायला, बोलायला, जगायला शिकविले.... म्हणूनच ‘स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी’ ही म्हण आपल्याला तिची महती सांगून जाते. मुलींसाठी आई म्हणजे तिची दुसरी मैत्रीणच. अशा या आई-मुलीच्या नात्यातील भावबंध व्यक्त करणारा ‘लोकमत सखी मंच’ व ‘कलर्स’तर्फे ‘तू माझा स्वाभिमान’ ही स्पर्धा मंगळवारी (दि. २०) उत्साहात पार पडली.
केशवराव भोसले नाट्यगृहात रंगलेल्या या कार्यक्रमात आई आणि मुलीच्या मैत्रीपूर्ण भावनात्मक नात्यावर आधारित ‘आम्ही दोघी माय-लेकी’ ही स्पर्धा घेण्यात आली. यावेळी सेलिब्रिटी जोडी म्हणून भरतनाट्यम नृत्यांगना संयोगिता पाटील, शोभा पाटील, दिशा पाटील व जाई पाटील उपस्थित होत्या.
स्पर्धेच्या चार फेऱ्यांमध्ये आई-मुलीच्या जोड्यांनी व्यासपीठावर प्रभावी सादरीकरण केले. स्पर्धेच्या पहिल्या फेरीमध्ये आई-मुलीच्या जोडीने कविता, शेरो-शायरीच्या अंदाजात एकमेकींची ओळख करून दिली. दुसऱ्या फेरीमध्ये आई-मुलीने गायन, नृत्य, अभिनय सादर केला. तिसरी फेरी सिच्युएशन राउंड होती. यात परीक्षकांनी एकेका जोडीसमोर परिस्थिती निर्माण करून तिच्याशी संबंधित प्रश्न विचारले. चौथी फेरी प्रश्नोत्तरांची होती. यात परीक्षकांनी आई आणि मुलीला एकमेकींच्या आवडीनिवडीवर प्रश्न विचारले. स्पर्धेचे परीक्षण रश्मी कुलकर्णी व शिल्पा इंगळे यांनी केले.
नेहमीच कौटुंबिक विषय घेऊन येणाऱ्या ‘कलर्स’ चॅनेलने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. ‘कलर्स’वर १९ डिसेंबरपासून सोमवार ते शुक्रवार रात्री साडेनऊ वाजता आई-मुलीच्या मजबूत नात्यावर ‘एक शृंगार... एक स्वाभिमान’ या मालिकेचे प्रसारण होत आहे. यात गणिताची शिक्षिका असलेल्या शारदा हिने आपल्या दोन मुलींना आधुनिक विचारांसोबतच स्वाभिमानाने जगणे शिकविले. मुलींना कर्मठ करण्यासाठी आधी नोकरी आणि नंतर लग्न करण्याची भूमिका घेऊन शारदा समाजासमोर अनेक प्रश्न निर्माण करते. नोकरी करण्याचा उद्देश केवळ पैसे मिळविणे नसून तो स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग आहे. घर सांभाळून नोकरी करणारी स्त्री आदर्श आणि नोकरीद्वारे करिअरला अधिक महत्त्व देणारी स्त्री आदर्श का नाही? असा प्रश्न शारदा समाजासमोर ठेवते. तिच्या प्रश्नांची उत्तरे काय आहेत, हे या मालिकेत दाखविण्यात आले आहे. ‘आम्ही दोघी माय-लेकी’मध्ये एक-दुसऱ्यांना समजून घेणाऱ्या, एकमेकींसोबत मैत्रिणींसारख्या वागणाऱ्या आई-मुलीच्या जोड्यांना या कार्यक्रमात पुरस्कृत करण्यात आले.
नितीन दीक्षित यांनी उपस्थित सखी सदस्यांसाठी वेगवेगळे गेम शो घेतले. त्यात महिलांनी पैठणीसह विविध बक्षिसे जिंकली.
‘आम्ही दोघी माय-लेकी’च्या विजेत्या
प्रथम : शुभलक्ष्मी देसाई-
प्रिया देसाई
द्वितीय : मनीषा झेले-रचना झेले
तृतीय : सुजाता अढाव-साक्षी अढाव
केशवराव भोसले नाट्यगृहात मंगळवारी झालेल्या ‘तू माझा स्वाभिमान’ कार्यक्रमातील विजेत्या मायलेकींसोबत परीक्षक रश्मी कुलकर्णी व शिल्पा इंगळे उपस्थित होत्या, तर दुसऱ्या छायाचित्रात स्पर्धेत नृत्य सादर करताना सुजाता अढाव व साक्षी अढाव.