कोल्हापूरकरांंच्या शुभेच्छामुळेच आमदार झालो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:37 AM2020-12-13T04:37:30+5:302020-12-13T04:37:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे : महाआघाडीच्या नेत्यांनी मला शिक्षक आमदारकीसाठी उमेदवारी दिली आणि सगळे कोल्हापूर एकवटले. आजवर जे कोल्हापूरकरांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे : महाआघाडीच्या नेत्यांनी मला शिक्षक आमदारकीसाठी उमेदवारी दिली आणि सगळे कोल्हापूर एकवटले. आजवर जे कोल्हापूरकरांच्या मनात आहे तेच घडते याची प्रचिती याही निवडणुकीत आली. ही निवडणूक प्रत्येक व्यक्तीने हातात घेऊन आपले योगदान व शुभेच्छा दिल्याने मी शिक्षक आमदार झालो अशी कृतज्ञता पूर्ण भावना नूतन शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी व्यक्त केली. वाकरे (ता. करवीर) येथे ग्रामपंचायत व विविध संस्था यांनी आयोजित केलेल्या नागरी सत्कारावेळी आ. प्रा. जयंत आसगावकर बोलत होते.
प्रा. आसगावकर व अनु आसगावकर यांचा विविध संस्थांनी सपत्नीक सत्कार केला. अध्यक्षस्थानी सरपंच वसंत तोडकर होते. प्रमुख उपस्थितीत उपसरपंच शारदा पाटील, जोतिर्लिंग पत संस्थेचे अध्यक्ष के. डी. पाटील, मधुकर तोडकर, ‘कुंभी’चे संचालक अनिल पाटील, वाय. एम. कांबळे उपस्थित होते.
आ. प्रा. आसगावकर म्हणाले, मुलांना आवश्यक मूलभूत शिक्षण, सुविधा यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे. शिक्षक, पालक यांच्या विचाराने या क्षेत्रातील असलेल्या अनेक अडचणींवर मात करणार आहे. माझ्या विजयात सर्वच घटकांनी मोलाचे योगदान दिल्याने माझ्या विरोधात असलेल्या ३४ उमेदवारांना एकत्र जेवढी मते मिळाली त्यापेक्षा जास्त मते मला मिळाल्याने माझा विक्रमी मताधिक्याने विजय झाला. हे कोल्हापूरकरांच्या शुभेच्छामुळे घडले.
यावेळी उपसरपंच शारदा पाटील यांनी आ. जयंत आसगावकर हे स्वतः शिक्षक, पालक, संस्थाचालक असल्याने शिक्षण क्षेत्रात असणाऱ्या अडचणींचा मोठा अभ्यास आहे. अनेक संघटना, संस्था यांच्यामध्ये सक्रिय काम करणारे आ. आसगावकर यांना संधी मिळाल्याने विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला फायदा होणार आहे.
यावेळी प्रा. एस. पी. चौगले, कुंडलिक पाटील, शिवाजी पाटील, एस. एस. पाटील व विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------------------------------------------
(फोटो) वाकरे (ता. करवीर) येथे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच वसंत तोडकर, उपसरपंच शारदा पाटील, आर. डी. मोरे, ‘कुंभी’चे संचालक अनिल पाटील, वाय. एम. कांबळे व इतर उपस्थित होते.