आई बनली लेखणी..‘ओंकार’ची यशाला गवसणी

By admin | Published: June 9, 2015 01:06 AM2015-06-09T01:06:48+5:302015-06-10T00:25:15+5:30

यशकथा : ‘सेरेब्रल पाल्सी’ने आजारावर मात करत मिळविले सत्तर टक्के गुण

I became a writer | आई बनली लेखणी..‘ओंकार’ची यशाला गवसणी

आई बनली लेखणी..‘ओंकार’ची यशाला गवसणी

Next

कोल्हापूर : ‘सेरेब्रल पाल्सी’ने आजारी असलेल्या येथील ओंकार मकरंद देशमुख याने आई अंजली यांच्या साथीने दहावीच्या परीक्षेत ७० टक्के गुण मिळविले. पराकोटीचे अपंगत्व असतानाही ओंकारने जिद्दीने मिळविलेले यश छोट्या-छोट्या गोष्टींसाठी निराश होणाऱ्या सर्वांनाच प्रेरणा देणारे आहे.ओंकार हा ‘सेरेब्रल पाल्सी’ या विकाराने त्रस्त आहे. तो जे काही बोलतो, ते केवळ त्याच्या आई-वडिलांनाच समजते; त्यामुळे त्याने दहावीची परीक्षा द्यायची कशी, अशी अडचण निर्माण झाली होती. कारण त्याला स्वत:ला तरी लिहिता येत नाही व तो जे सांगतो ते इतरांना समजत नाही. आईला लेखनिक म्हणून देण्याची तरतूद नव्हती. मुलाने दहावीची परीक्षा द्यावी यासाठी पालक प्रयत्नशील होते.
अखेरचा पर्याय म्हणून कुटुंबीयांनी ओंकारच्या लेखनिक (रायटर) म्हणून त्याच्या आर्इंना परवानगी द्यावी, अशी मागणी लेखी पत्राद्वारे शिक्षण मंडळाकडे केली. ओंकारची स्थिती लक्षात घेऊन, त्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ‘विशेष बाब’ म्हणून राज्य शासनाने त्याची आई अंजली यांना परीक्षेत लेखनिक म्हणून परवानगी दिली. शासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे ओंकारला दहावीची परीक्षा देता आली.
या संधीचे सोने करण्याची किमया ओंकारने जिद्दीने केली. आपण परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याचे समजताच त्याला झालेला आनंद शब्दांत मांडता येत नाही. त्याने या आनंदाप्रीत्यर्थ वाटलेल्या पेढ्यांनाही वेगळाच सुगंध होता. मुलाचे यश पाहून आईचेही डोळे आनंदाश्रूंनी डबडबले.
ओंकार हा ‘लोकमत’ कोल्हापूरचे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांचा मुलगा आहे. त्याच्या यशात राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा कोल्हापूर विभाग, कोल्हापुरातील दादासाहेब मगदूम हायस्कूल आणि औरंगाबादमधील महाराष्ट्र हिंदी विद्यालयाचे योगदान महत्त्वाचे ठरल्याची प्रतिक्रिया ओंकारच्या आई अंजली यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)

Web Title: I became a writer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.