अर्धा कप पाण्यात चार बिस्किटे बुडवून खाल्ली अन् दिवस काढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 06:41 PM2021-06-17T18:41:19+5:302021-06-17T18:49:22+5:30
EverestGirl Kolhapur : खाण्याचे अन्न आणि पाणी तयार करण्यासाठी इंधनही संपल्याने नाईलाजाने परतीचा मार्ग धरावा लागला. परत येताना देखील अर्धा कप पाण्यात चार बिस्किट बुडवून खात दिवस काढावा लागला. इंधन संपल्याने बर्फापासून पाणीही तयार करता येत नसल्याने अर्धा लिटर पाण्यात चौघांची तहान भागवावी लागली असा एव्हरेस्ट प्रवासातील थरारक अनुभवांचा पट गिर्यारोहक कस्तूरी सावेकर हिने गुुरुवारी येथे पत्रकार परिषदेत उलगडला.
कोल्हापूर : खाण्याचे अन्न आणि पाणी तयार करण्यासाठी इंधनही संपल्याने नाईलाजाने परतीचा मार्ग धरावा लागला. परत येताना देखील अर्धा कप पाण्यात चार बिस्किट बुडवून खात दिवस काढावा लागला. इंधन संपल्याने बर्फापासून पाणीही तयार करता येत नसल्याने अर्धा लिटर पाण्यात चौघांची तहान भागवावी लागली असा एव्हरेस्ट प्रवासातील थरारक अनुभवांचा पट गिर्यारोहक कस्तूरी सावेकर हिने गुुरुवारी येथे पत्रकार परिषदेत उलगडला.
नेपाळमध्ये काठमांडूला विमानतळावरून सुरू झालेला वातावरणाशी संघर्ष एव्हरेस्टच्या बेस कॅम्प तीनवर पोहचेपर्यंत सुरूच होता. शेवटची चौथ्या कॅम्पवरची चढाई करण्याची मानसिक तयारी होती, पण प्रचंड गार वारे, बर्फाच्या वादळासमोर टेन्टचाही टिकाव लागू शकला नाही.
हवामानाची योग्य साथ न मिळाल्याने एव्हरेस्ट मोहीम पुढील वर्षी नव्या हिमतीने पूर्ण करायची हा निश्चय करत कोल्हापुरात परत आलेल्या कस्तूरी सावेकर हिने गुरुवारी माध्यमांसमोर मोहिमेचा थरारक अनुभव कथन केला.
यावेळी गिरिप्रेमी संस्थेचे अध्यक्ष व कस्तूरीचे प्रमुख मार्गदर्शक उमेश झिरपे, एव्हरेस्ट सर केलेले आशिष माने व जितेंद्र गवारे यांनीही या मोहिमेचा खडतर प्रवास मांडला. करवीर हायकर्सचे अध्यक्ष दीपक सावेकर, अमर अडके यांची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शक उमेश झिरपे यांनीही कस्तूरी अगदी लहान वयात मोठे ध्येय गाठण्याची क्षमता राखणारी मुलगी आहे, तिने अनेक खडतर प्रसंग अनुभवले आहे, त्यातून तिचे मानसिक बळ वाढणार आहे, हेच तिला पुढील मोहिमेत कामी येणार आहे, असे सांगितले.