पुरावे न सापडणे लाजिरवाणे
By admin | Published: August 21, 2016 12:10 AM2016-08-21T00:10:26+5:302016-08-21T00:20:30+5:30
एन. डी. पाटील : निर्भय मॉर्निंग वॉक; शहीद पानसरे संघर्ष समितीतर्फे आयोजन
कोल्हापूर : डॉ. नरेंद्र दाभोलकर, ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या खुन्यांना न्यायालयात आरोपी म्हणून उभे करण्याएवढे पुरावे सरकारला गोळा करता आले नाहीत, ही लाजिरवाणी गोष्ट आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी शनिवारी निषेध व्यक्त केला.
शहीद गोविंद पानसरे समता संघर्ष समितीतर्फे ‘हिंसा के खिलाफ, मानवता की ओर’ या अभियानांतर्गत ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ झाला. यावेळी डॉ. पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी प्रा. डॉ. मेघा पानसरे, माजी प्राचार्य टी. एस. पाटील, दलितमित्र व्यंकाप्पा भोसले, दिलीप पवार यांच्यासह विविध स्तरांतील मान्यवर उपस्थित होते.
डॉ. पाटील म्हणाले, अन्यायी व्यवस्था बदलण्यासाठी हयात खर्च केलेल्या विचारवंतांच्या हत्येच्या तपासाबाबत सरकारमध्ये उदासीनता दिसून येते. उच्च न्यायालयाने आदेश देऊनही तपास गंभीरपणे होताना दिसत नाही. अधिकाऱ्यांच्या विनाकारण बदल्या केल्या जातात. जनतेचा व्यापक लढा उभारून सरकारला जागे करण्यासाठी मॉर्निंग वॉक होत आहे. सविनय कायदेभंगाची किंमत सरकारला कळत नसेल तर हे लोकशाहीला घातक आहे.
विचारवंतांच्या हत्या होऊन आता बराच कालावधी होत आला तरी तपास यंत्रणेला या हत्येमागील सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यात यश आलेले नाही. सर्वसामान्यांसाठी बलिदान देणाऱ्या विचारवंतांना न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्यांना न्याय कसा काय मिळत असेल? असा प्रश्न डॉ. पाटील यांनी उपस्थित केला.
सकाळी सात वाजता केशवराव भोसले नाट्यगृह येथून ‘मॉर्निंग वॉक’ला सुरुवात झाली. चळवळीतील गाणी म्हणत व ‘शहीद गोविंद पानसरे अमर रहे’, ‘लडेंगे जितेंगे,’ ‘भारतीय संविधानाचा
विजय असो’च्या घोषणा देत मंगळवार पेठ, देवणे गल्ली, तस्ते गल्ली, कोष्टी गल्ली, मंडलिक गल्ली, राम गल्ली, शाहू बॅँक, नंगीवली चौक, पाण्याचा खजिना, लाड चौक, बजापराव माने तालीम, सणगर तालीम, पोतनीस बोळ, मिरजकर तिकटी या मार्गावरून काढण्यात आलेल्या रॅलीचा
समारोप केशवराव भोसले नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारात करण्यात आला.
यावेळी रणजित कांबळे यांनी ‘फक्त कामगार सेना होती आमच्या पाठीशी’ हा पोवाडा सादर केला.
या फेरीत तनुजा शिपूरकर, उमेश सूर्यवंशी, कृष्णात कोरे, अभिषेक मिठारी, स्वाती कोरे, अरुण पाटील, सीमा पाटील, एम. बी. पडवळे, कपिल मुळे, संघसेन जगतकर, रमेश वडणगेकर, दत्ता पाटील, निशांत शिंदे, अनिल पाटील, गौतम कांबळे, बिजली कांबळे, सुभाष वाणी, एस. बी. पाटील, उमेश पानसरे, निहाल शिपूरकर, आदी मान्यवर सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)