'किरीट सोमैयांच्या C.A.च्या पदवीवरच मला शंका, 100 कोटींचा दावा ठोकणार'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 11:51 AM2021-09-20T11:51:57+5:302021-09-20T11:54:03+5:30
किरीट सोमैय्यांच्या आरोपानंतर हसन मुश्रिफ यांनीही पत्रकार परिषद घेऊन आरोप फेटाळले आहेत. माझ्यावर आणि जावयांवर करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे असून मला तर सोमैय्यांच्या सीए पदवीवरच शंका येतेय, असा टोला मुश्रिफ यांनी लगावला.
कोल्हापूर - भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना कराड पोलिसांनी ओगलेवाडी येथील रेल्वे स्टेशनवर ताब्यात घेतले आहे. आज मंगळवार रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास ते कोल्हापूरकडे जात असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांना शासकीय विश्रामगृहाकडे नेण्यात आले. त्यानंतर, किरीट सोमैय्यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना सवाल केला. तसेच, मंत्री हसन मुश्रिफ आणि त्यांच्या जावयावर भ्रष्ट्राचाराचे आरोपही केले. मात्र, हे आरोप बिनबुडाचे असल्याचे हसन मुश्रिफ यांनी म्हटलंय.
किरीट सोमैय्यांच्या आरोपानंतर हसन मुश्रिफ यांनीही पत्रकार परिषद घेऊन आरोप फेटाळले आहेत. माझ्यावर आणि जावयांवर करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे असून मला तर सोमैय्यांच्या सीए पदवीवरच शंका येतेय, असा टोला मुश्रिफ यांनी लगावला. मी त्यांना कोल्हापुरात येण्यापासून अडवलं नाही, तर कायदेशीर प्रक्रियेचा भाग, आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, म्हणून त्यांना पोलीस प्रशासनाने स्थानबद्ध केलं होतं. मी एकेदिवशी त्यांना कारखान्याचं पर्यटन आवर्जून करवतो, असेही मुश्रीफ यांनी म्हटलं. तसेच, माझ्यावर सातत्याने होत असलेल्या आरोपाच्या मागे भाजपचं मोठं षडयंत्र असून याचे मास्टरमाईंड हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आहेत. पाटील ज्या प्रदेशाचं प्रतिनिधित्व करतात, तेथे भाजपा भुईसपाट झालीय आणि ती मीच भुईसपाट केलीय. मला भाजपाकडून वारंवार ऑफर देण्यात आल्या. पण, मी पवार एके पवार अशी भूमिका घेतल्यानेच जाणीवपूर्वक हे कट कारस्थान करण्यात येत असल्याचं मुश्रिफ यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं.
१०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार
किरीट सोमय्या यांनी संपूर्ण माहिती घेऊन भाष्य करावं. त्यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत. सोमय्यांच्या आरोपाने भाजपाची प्रतिमा मलिन होतेय. किरीट सोमय्यांनी हवी तिथं खुशाल चौकशी करावी. महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठीच भाजपाकडून वारंवार आरोप लावले जात आहेत. सोमय्यांना कारखान्याचं नाव सुद्धा वाचता येत नाही. आयकर विभागाने दोन वर्षापूर्वीच चौकशी केली आहे. किरीट सोमय्यांना काहीही माहिती नाही, कुठलेही पुरावे नसताना आरोप केल्यामुळे १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा कोर्टात दाखल करणार असल्याचा इशारा मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला आहे.
हसन मुश्रिफांमुळे अंबमाईचं दर्शन नाही
गणेश विसर्जनादिवशी सकाळी मला माझ्याच कार्यालयात ४ तास रोखण्यात आलं. मला का रोखण्यात आलं याचं उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील देणार का? मला कोल्हापूरात प्रवेशबंदी आहे. मग मुंबईत मला का रोखलं जातंय? कोल्हापूरच्या वेशीवर रोखा, असं म्हणत सोमय्यांनी पोलिसी कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मला कोल्हापूरपर्यंत पोहोचू दिलं जाणार नाही. हसन मुश्रिफांमुळे किरीट सोमैय्याला कोल्हापूरच्या अंबेमाईचं दर्शन करता आलं, नाही, असे म्हणत सोमैय्यांनी पत्रकार परिषदेची सुरुवात केली.
पुढच्या आठवड्यात आणखी घोटाळा बाहेर काढणार
आप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखान्यात मुश्रीफांनी शंभर कोटींचा घोटाळा केला असून त्याची चौकशी होणे अपेक्षित आहे. पुढच्या आठवड्यात हसन मुश्रीफांचा आणखी एक घोटाळा मी समोर आणणार आहे. मी अर्थमंत्रालय, आयकर खात्याचे अध्यक्ष, ईडीचे संचालक, सहकार मंत्रालयामध्ये २ हजार ७०० पानांचे पुरावे दिलेत. त्यावर चौकशी सुरु झाली असून मी अधिक माहिती मागवली आहे ती माहिती दोन दिवसांत मला मिळेल. ईडी आणि संचालक मंडळाकडून याची चौकशी सुरु आहे. त्या भीतीनेच राष्ट्रवादीचे गुंड माझ्यावर हल्ला करीत आहेत. हसन मुश्रीफांच्या स्वागतासाठी जनसमुदायाला परवानगी दिली जाते. मग, मला कोल्हापुरात येण्यास परवानगी का नाही? सध्या या प्रकरणावरून लक्ष वळवण्यासाठी शरद पवारांनी एक व्यूहरचना आखली आहे. मात्र, त्याचा काहीही परिणाम होणार नाही. मी मुश्रीफांचे घोटाळे बाहेर काढणारच आहे.
घोटाळेबाजाऐवजी, घोटाळा उघड करणाऱ्यांनाच ठाकरे सरकारने अटक केली. मला कोल्हापूर जिल्हा प्रवेशबंदी करण्यात आली. कागल येथे हसन मुश्रिफ यांचा दौरा आहे, त्याचवेळेस सोमैय्या कोल्हापूरात येत आहेत. त्यामुळे, गनिमी काव्याने किरीट सोमैय्यांवर हल्ला होण्याची शक्यता आहे, असे मला पत्रातून कळविण्या आले आहे. हसन मुश्रीफ यांच्या स्वागताला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते येणार होते की राष्ट्रवादीचे गुंड. राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच गुंड आहेत का? असा प्रश्न किरीट सोमैय्या यांनी विचारला आहे.