‘आयएएस’ला सारेच भुलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:26 AM2021-05-06T04:26:23+5:302021-05-06T04:26:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्हाधिकारी झाला म्हणून गावातून जल्लोषी मिरवणूकही काढली, त्यानंतर त्याची पतही उंचावली, गुजरातमध्ये जिल्हाधिकारी असल्याचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्हाधिकारी झाला म्हणून गावातून जल्लोषी मिरवणूकही काढली, त्यानंतर त्याची पतही उंचावली, गुजरातमध्ये जिल्हाधिकारी असल्याचे त्याने अनेकांना सांगितले. त्यामुळे त्याचा गावात राबताही कमी आला. वर्षातून अधूनमधून कधीतरी त्याचे या आलिशान मोटारीतून गावात दर्शन होऊ लागले. त्याचा उंचावलेला दर्जा पाहून कोल्हापुरातील एका पोलीस अधिकाऱ्याने आपल्या मुलीचे गेल्याच वर्षी त्याच्याशी लग्न लावून दिले. अशा रुबाबात वावरणाऱ्या तोतया जिल्हाधिकाऱ्याचा रुबाब अखेर रत्नागिरी पोलिसांनी उतरवला. अर्जुन श्यामराव सकपाळ असे त्याचे नाव आहे. त्याला रत्नागिरी पोलिसांनी ओणी (ता. राजापूर) येथून अटक केली.
महाराष्ट्र शासनाचे उपसचिवांच्या नावाने बनावट डिजिटल सहीचा वापर करून तीन अधिकाऱ्यांच्या बदलीचा खोटा आदेश तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला होता. तसेच रत्नागिरीचे नवे जिल्हाधिकारी म्हणून पत्रात त्याने आपलेच नाव घातले होते. त्याप्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी पर्दाफाश करत त्याला गजाआड केले.
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील उपवडे पैकी न्हाव्याचीवाडी हे अर्जुन सकपाळचे गाव आहे. त्याची घरची परिस्थिती बेताची, घरही लहान, घरी दुभती जनावरे असे साधारण घरचे चित्र होते. अभ्यासात हुशार असून त्याचे शिक्षण बीपी.एड.पर्यंत झाले असल्याची शक्यता अनेकांनी वर्तवली; पण सात वर्षांपूर्वी त्याने शक्कल लढवली व आपण आयएएस परीक्षा पास झाल्याने जिल्हाधिकारी बनल्याचे सांगून गावातून जल्लोषी मिरवणूकही काढली. त्यानंतर त्याचा स्तर उंचावला. तो गावातून गायब झाला. त्यानंतर गुजरातमध्ये एका जिल्ह्याचा जिल्हाधिकारी बनल्याचे अनेकांना सांगितले. वर्षातून तीन-चार वेळा आलिशान मोटारीतून दिमाखात येत होता, काही तासांचा वावर दाखवून पुन्हा जात होता. त्याचे गावात मोजकेत मित्र होते.
त्याच्या या रुबाबाला भुलून जिल्ह्यातील एक निवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक बळी पडले, त्यांनाही त्याने आपण गुजरातमध्ये जिल्हाधिकारी असल्याचे भासवल्याचे समजते, त्यांच्या मुलीशी गेल्याच वर्षी त्याचा कोकणातील एका रिसॉर्टवर विवाह झाला आहे. त्याच रिसॉर्टवर रत्नागिरी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
फुलेवाडी रिंग रोडवर आलिशन बंगला
त्याची आर्थिक परिस्थिती बेताची असताना त्याने फुलेवाडी रिंग रोडवर आलिशान बंगला गेल्याच वर्षी खरेदी केला आहे. गावाकडील दुभती जनावरे, शेती विकून त्याने भाऊ, आई-वडील यांना त्या बंगल्यात आणून ठेवले आहे.
वारंवार फोन नंबर बदलण्याची सवय
त्याचा गावाकडे मोजकाच मित्र परिवार आहे; पण मोठे बोलणे व अनेकांना तो जिल्हाधिकारी असल्याचेच सांगत असतो. काहींचा ससेमिरा चुकवण्यासाठी तो आपला मोबाइल नंबर वारंवार बदलत असल्याचे त्याच्या गावातील काहींनी माहिती दिली.
कोल्हापूर पोलिसांनाही चकवा
काही महिन्यांपूर्वी त्याने कोल्हापूर पोलिसांनाही आपण गुजरातमध्ये जिल्हाधिकारी आहोत, लवकरच रत्नागिरीत बदलून येतोय अशा भूलथापा मारून काही पोलिसांनाही चकवा दिल्याचे समजते.
फोटो नं.०५०५२०२१-कोल-अर्जुन सकपाळ
===Photopath===
050521\05kol_13_05052021_5.jpg
===Caption===
फोटो नं.०५०५२०२१-कोल-अर्जून सकपाळ