मुख्यमंत्र्यांचा फोन आला, माझी उमेदवारी निश्चित; संजय मंडलिक यांना विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 11:45 AM2024-03-26T11:45:15+5:302024-03-26T11:45:45+5:30
मुश्रीफ, धनंजय महाडिक यांची घेतली भेट
कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करून आपली उमेदवारी निश्चित झाल्याचे सांगितल्याची माहिती खासदार संजय मंडलिक यांनी दिली. यामुळेच पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार धनंजय महाडिक यांची सोमवारी संध्याकाळी स्वतंत्रपणे भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच प्रचाराच्या व्यापक नियोजनासाठी बैठक घेण्याचा निर्णय या दोघांच्या बैठकीत घेण्यात आला.
मुख्यमंत्री शिंदे यांनी मंडलिक यांना कामाला लागण्याच्या सूचना सोमवारी दिल्यानंतर मंडलिक यांनी प्रमुख कार्यकर्त्यांसह मुश्रीफ यांची जिल्हा बँकेत भेट घेतली. यावेळी प्राथमिक चर्चा करण्यात आली. महायुतीच्या उमेदवारांची नावे आज मंगळवारी जाहीर होणार असल्याचे खात्रीने सांगितले जात असून, म्हणूनच मंडलिक यांनी मुश्रीफ यांची भेट घेतली. उमेदवारी जाहीर होताच, प्रचाराच्या नियोजनासाठी तातडीने बैठक घेण्याची ग्वाही मुश्रीफ यांनी यावेळी दिली. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने उपस्थित होते.
दुसरीकडे मंडलिक यांनी खासदार धनंजय महाडिक यांचीही पंपावर जाऊन भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये प्रचाराच्या नियोजनाबाबत प्राथमिक चर्चा झाली. अधिकृतपणे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर व्यापक मेळावा घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. मंडलिक हे आज मंगळवारी समरजीत घाटगे यांची भेट घेणार आहेत.
तीनही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या होणार बैठका
मंडलिक यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीनही पक्षांच्या शहर आणि ग्रामीणच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे प्राथमिक नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठीच अधिकृत घोषणेची वाट पाहिली जात असून, त्यानंतरच तातडीने या हालचाली होतील.
इनकमिंगमुळे यादीला विलंब
राज ठाकरे यांच्यासारखे नेते, महादेव जानकर यांच्या रासपसारखे छोटे पक्ष महायुतीमध्ये सहभागी होत आहेत. ही एक प्रक्रिया आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार जाहीर करण्यास विलंब होत असल्याचे मंडलिक यांनी सांगितले.