Mann Ki Baat : आयुष्यात एकदा तरी पंढरीची वारी अनुभवावी - पंतप्रधान नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2018 01:59 PM2018-07-29T13:59:12+5:302018-07-29T14:12:19+5:30
मन की बातच्या माध्यमातून भारतातील सर्व लोकांपर्यंत महाराष्ट्राच्या या मोठ्या भक्तीधारेची माहिती मोदींनी पोहोचवावी अशी विनंती गाताडे यांनी केली होती.
कोल्हापूर : कोल्हापूर येथील सेवाव्रती संतोष गाताडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून, पंढरपूरच्या वारीची माहिती दिली. मन की बातच्या माध्यमातून भारतातील सर्व लोकांपर्यंत महाराष्ट्राच्या या मोठ्या भक्तीधारेची माहिती मोदींनी पोहोचवावी अशी विनंती गाताडे यांनी केली होती. त्यानुसार 29 जुलैच्या मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी वारीबाबत सविस्तर अशी माहिती दिली.
पंढरपूरची ही वारीची माहिती जगभर पुन्हा लोकांपर्यंत पोहोचली. मोदी यांनी या वारीत सहभागी होण्याचे आवाहन देशवासियांना केले. कोल्हापूरच्या संतोष गाताडे यांनी कोल्हापूरची संवेदनशीलता या निमित्ताने दाखवून दिली. समस्त कोल्हापूरकर, वारकरी भक्त परंपरा या सर्वांच्या वतीने संतोष गाताडे यांचे अभिनंदन होत आहे. गाताडे कोल्हापूर आणि परिसरात वैद्यकीय क्षेत्रांत सेवाभावी , निरलसपणे काम करतात. माधव नेत्रपेढीचे काम ते येथे करत आहेत.
पंढरपूर वारी म्हणजे अद्भूत यात्रा – मोदी
पंढरपूरची वारी म्हणजे अद्भूत यात्रा आहे असं ते म्हणाले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासह महाराष्ट्रातील संतांनी देशाला प्रेरणा दिली आहे. त्यांच्या विचारांमुळे अंधश्रद्धेविरुद्धच्या लढाईला बळ मिळत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. देशातील प्रत्येक नागरिकाने पंढरपूरच्या वारीला एकदातरी जावं, असं आवाहनही पंतप्रधान मोदींनी केलं.