‘मी पंचगंगा बोलते’ आता सोशल मीडियावर...
By admin | Published: December 14, 2015 12:20 AM2015-12-14T00:20:05+5:302015-12-14T00:53:47+5:30
प्रदूषणाबाबत जनजागृती : जिल्हा परिषदेचा पुढाकार; नऊ मिनिटांची चित्रफीत
भीमगोंडा देसाई --कोल्हापूर---पंचगंगा नदी प्रदूषणासंबंधी जाणीवजागृती सोशल मीडियाद्वारे अधिकाधिक लोकांत करण्यासाठी ‘मी पंचगंगा बोलते’ या नावाने नऊ मिनिटांची चित्रफीत तयार करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. येथील मनोहरी चित्रनिर्मिती संस्थेने ही चित्रफीत बनविली आहे. जिल्हा परिषद प्रशासन या चित्रफितीचे प्रसारण करणार आहे. पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रदूषणास विविध घटक जबाबदार आहेत. परिणामी प्रदूषित पाणी नळयोजनेद्वारे नदीकाठावरील गावांत पुरवठा झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिका, इचलकरंजी नगरपालिका, औद्योगिक विभागाचे प्रशासन, जिल्हा परिषद यांनी यापूर्वी ठोस पावले उचलली नाहीत. त्यामुळे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने हा प्रश्न गांभीर्याने घेऊन प्रत्येक सुनावणीत प्रदूषण रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या त्याचा आढावा घेत आहे. न्यायालयाच्या आदेशानुसारच विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली तात्पुरत्या आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर देखरेख आणि नियंत्रण ठेवण्यासाठी समिती कार्यरत आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी विशेष लक्ष घालून पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासन गतिमान केले. गणेशोत्सव काळात गणेशमूर्ती आणि निर्माल्य विसर्जनामुळे पंचगंगा नदीचे प्रचंड प्रदूषण होते. हे थांबविण्यासाठी सुभेदार यांनी यंदा चांगले नियोजन केले. भक्तांचे सहकार्य, प्रशासनाने केलेले आवाहन यामुळे मूर्ती आणि निर्माल्य दानला ऐतिहासिक प्रतिसाद मिळाला. तब्बल सातशे ते आठशे ट्रॉली निर्माल्य आणि ५० हजारांवर दान मूर्ती एकत्र करून कुणाच्याही भावनेला धक्का न लावता खुल्या खणीत आणि पडीक विहिरीत मूर्ती विसर्जित केल्या. यशस्वी झालेल्या या उपक्रमाची दखल राज्यपातळीवर शासकीय यंत्रणेने घेतली. हा उपक्रम यशस्वी कसा केला, पंचगंगा आधी कशी होती, आता तिचे स्वरूप कसे आहे, प्रदूषण रोखण्यासाठी जिल्हा परिषदेने राबविलेले अन्य विविध उपक्रम, लोकांचा सहभाग, प्रदूषण रोखण्यासाठी समाजातील विविध घटकांनी काय करायला हवे, आदी प्रमुख विषयांवर चित्रफितीद्वारे प्रकाशझोत टाकला आहे. राधानगरीपासून इचलकरंजी, शिरोळ तालुक्यापर्यंत नदीकाठावरील काढलेले लक्षवेधी फोटो आणि परिणामकारक संवाद, मूर्ती आणि निर्माल्य दानवेळी चित्रीकरणाचेकाही शॉटस्, पार्श्वसंगीत याचा समावेश चित्रफितीत आहे. मनोहरी चित्र निर्मिती संस्थेचे संकेत रणदिवे यांनी ही चित्रफीत तयार केली आहे. अलीकडे वाढलेल्या सोशल मीडियाचा वापर करून जागृतीसाठी आणि जिल्हा, राज्य पातळीवरील विविध आढावा बैठकीत सादरीकरणासाठी चित्रफितीचा वापर जिल्हा परिषद करणार आहे.
वाढत्या प्रदूषणाबाबत ‘मी पंचगंगा बोलते’ या नावाने नऊ मिनिटांची चित्रफीत तयार केली आहे. जिल्हा परिषदेने ही चित्रफीत बनविण्याचे काम दिले होते. या चित्रफितीचे काम आता पूर्ण झाले असून, तिचे प्रसारण जिल्हा परिषद प्रशासन करणार आहे.
- संकेत रणदिवे, निर्माता,
मनोहरी चित्र निर्मिती संस्था