‘मी माझ्या मुलांचा’ने स्पर्धेला प्रारंभ
By admin | Published: November 18, 2014 12:43 AM2014-11-18T00:43:35+5:302014-11-18T01:03:35+5:30
रंगदेवता, रसिकांना अभिवादन : ५४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा
कोल्हापूर : रंगदेवता, मायबाप रसिक प्रेक्षकांना अभिवादन करून आज, सोमवारी ‘कलानगरी’ म्हणून बिरूदावली मिरवणाऱ्या कोल्हापुरात महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने आयोजित ५४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेला प्रारंभ झाला. शाहू स्मारक भवनमध्ये पहिल्यांदाच वाजलेल्या या तिसऱ्या घंटेला रसिकांनी हाऊसफुल्ल हजेरी लावली. पहिल्या दिवशी स्थापत्य बांधकाम व सुव्यवस्था मंडळ (उद्योग भवन) यांचे ‘मी माझ्या मुलांचा’ हे नाटक सादर झाले.
कोल्हापूरच्या हौशी रंगभूमी चळवळीला उभारीचे निमित्त ठरलेल्या राज्य नाट्य स्पर्धेचे उद्घाटन सांस्कृतिक सहसंचालक अमिता तळेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी मराठी रंगभूमी आणि अभिनय क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ रंगकर्मी शरद भुताडिया यांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर यावेळी मुख्य लेखाधिकारी विश्वनाथ साळवी, कार्यक्रम अधिकारी भरत लांघी, स्पर्धेचे समन्वयक मिलिंद अष्टेकर, सुहास वळूंजकर, मनोहर धोत्रे, भालचंद्र कुबल उपस्थित होते.
सत्कारानंतर भुताडिया म्हणाले, नाटक किंवा अभिनय ही गोष्ट फक्त शिकवून येत नाही तर ते वारंवार करावी लागते. त्याची उत्तम संधी या राज्य नाट्यस्पर्धेमुळे मिळते. खरंतर राज्य नाट्य म्हणजे मराठी नाटकांची लॅब आहे . पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले. कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष मनोहर कुर्इंगडे, नाट्यवितरक आनंद कुलकर्णी, प्रफुल्ल महाजन, प्रशांत जोशी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
रंगकर्मींना शपथ
यंदाच्या वर्षीपासून सांस्कृतिक कार्य संचालनालयाने स्पर्धेच्या पहिल्या दिवशी सर्व रंगकर्मींना शपथ दिली जात आहे. अमिता तळेकर यांनी रंगकर्मींना ‘मी या स्पर्धेदरम्यान सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून माझी जबाबदारी प्रामाणिकपणे, नि:स्पृहपणे व आनंदाने पार पाडेन’ अशी शपथ दिली.
कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनमध्ये सोमवारपासून राज्य नाट्य स्पर्धेला प्रारंभ झाला. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी शरद भुताडिया यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अमिता तळेकर, विश्वनाथ साळवी, भरत लांघी, मिलिंद अष्टेकर, सुहास वळुंजकर, मनोहर धोत्रे, भालचंद्र कुबल उपस्थित होते.
नाटकांचे वेळापत्रक
१८ नोव्हेंबर : अक्षरसिंधू साहित्य कलामंच, कणकवली - तर्पण
१९ नोव्हेंबर : भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र - ट्रिपल सीट
२० नोव्हेंबर : देवल क्लब - प्रियांका आणि दोन चोर
२१ नोव्हेंबर : हृदयस्पर्श हौशी सांस्कृतिक व्यासपीठ - एकच प्याला
२२ नोव्हेंबर : कुंभी-कासारी बहुउद्देशीय शेतकरी मंडळ - टुडे इज अ गिफ्ट
२३ नोव्हेंबर : नाट्यशुभांगी, जयसिंगपूर - टू इज कंपनी
२४ नोव्हेंबर : नवनाट्य मंडळ, आजरा - तमसो मा़़़़
२५ नोव्हेंबर : पदन्यास कला अकादमी - चिताई
२६ नोव्हेंबर : सुगुण नाट्यकला संस्था - नटसम्राट
२७ नोव्हेंबर : प्रतिज्ञा नाट्यरंग - किरवंत
२८ नोव्हेंबर : प्रत्यय नाट्यसंस्था, क्राइम अँड पनिशमेंट
२९ नोव्हेंबर : रंगयात्रा, इचलकरंजी - ती रात्र
३० नोव्हेंबर : एस.टी. नाट्यसंघ - एक कप चहासाठी
०१ डिसेंबर : परिवर्तन कला फौंडेशन - कावळा आख्यान
०२ डिसेंबर : हनुमान तरुण मंडळ - लव्ह इथले ़़़ भयकारी
०३ डिसेंबर : वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान, कणकवली - एक दिवस मठाकडे
०४ डिसेंबर : वरेकर नाट्य संस्था, बेळगाव - वेडिंग अल्बम