मी इच्छुक आहे, तुमची मदत हवी..!
By admin | Published: November 7, 2015 11:33 PM2015-11-07T23:33:35+5:302015-11-08T00:07:44+5:30
विधानपरिषदेचे रणांगण : सतेज पाटील यांच्या भेटीगाठी
कोल्हापूर : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून मी इच्छुक आहे. तुमची मदत हवी आहे, असे आवाहन करीत माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीचा थेट प्रचारच सुरू केला आहे. आज, शनिवारी त्यांनी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या.
विधानपरिषदेच्या निवडणुकीत कोल्हापूर महापालिकेतील मतांचा गठ्ठा कायमच निर्णायक ठरत आला आहे. आमदार महादेवराव महाडिक हे महापालिकेतील किमान ५० मते पाठीशी घेऊनच मैदानात उतरत. त्यामुळे त्यांच्या मतांची मोजणी ५१ पासून होई. या लढतीत ते विजयी होण्याचे तेच महत्त्वाचे कारण असे. यंदाही त्यांनी ताराराणी आघाडीची स्वतंत्र चूल मांडण्यामागे हेच राजकारण आहे. त्यामुळेच सतेज पाटील यांनीही महापालिकेचा निकाल लागेपर्यंत आपले पत्ते खुले केले नव्हते. आता तिथे काँग्रेसला २७ जागा मिळाल्यावर त्यांनी थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसची उमेदवारी कुणाला मिळणार हा या लढतीतील कळीचा मुद्दा आहे. परंतु, उमेदवारीबाबत पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून काहीतरी ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय पाटील प्रचाराला लागणार नाहीत, असेही सांगण्यात येत आहे.
पाटील यांनी शनिवारी सकाळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांची त्यांच्या राजारामपुरीतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली व या निवडणुकीत आपण मला सहकार्य करावे, अशी विनंती केली. त्यानंतर त्यांनी दुपारी खासदार राजू शेट्टी, राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र यड्रावकर, काँग्रेसचे गणपतराव पाटील, सायंकाळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते विनय कोरे यांची वारणानगरला जाऊन भेट घेतली. शुक्रवारी (दि. ६) त्यांनी आजरा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सदस्यांची भेट घेतली होती. आज, रविवारी त्यांचा गडहिंग्लज व इचलकरंजी दौरा आहे. या दौऱ्यात ते माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांच्यासह अन्य नेत्यांना भेटणार आहेत. (प्रतिनिधी)