मरण पत्करू, पण शरण येणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:29 AM2021-09-06T04:29:14+5:302021-09-06T04:29:14+5:30
कोल्हापूर: राज्यातील महाविकास आघाडी सरकारला सत्याग्रहाच्या मार्गानेच गुडघे टेकायला भाग पाडून पूरग्रस्तांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. प्रसंगी ...
कोल्हापूर: राज्यातील महाविकास आघाडी सरकारला सत्याग्रहाच्या मार्गानेच गुडघे टेकायला भाग पाडून पूरग्रस्तांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. प्रसंगी मरण पत्करू, पण कोणालाही शरण येणार नाही, अशी गर्जना स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी पूरग्रस्तांच्या आक्राेश पदयात्रेच्या सांगता सभेत केले. आम्हाला उद्ध्वस्त करून राज्य करायचे असेल तर खुशाल आमच्या मुडद्यावर बसून करा, असे आव्हानही दिले. केंद्र सरकारच्या सापत्नभावामुळेच पूरग्रस्तांची होरपळ होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
प्रयाग चिखली येथून बुधवारी सुरू झालेली आक्रोश पदयात्रा व पंचगंगा परिक्रमेची सांगता रविवारी संध्याकाळी नृसिंहवाडीत जाहीर सभेने झाली. प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील, माजी सभापती राजेश पाटील, सावकर मादनाईक यांच्यासह स्वाभिमानीचे सर्व कार्यकर्ते, शेतकरी, युवक, महिला मोठ्यासंख्येने उपस्थिती होते. या पदयात्रेच्या निमिताने पंचगंगा काठाने पुन्हा एकदा जनजागराचा पूर अनुभवला.
सभेत बोलताना शेट्टी म्हणाले की, जीवनदायी नद्या आता आमच्या मुळावर उठल्या आहेत, यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची गरज आहे. पाण्याचा प्रवाहाचा अभ्यास न करता ठेकेदारांच्या सोईसाठी केलेल्या पुलांच्या व रस्त्यांच्या भरावाचा फटका आम्हाला बसत आहे. आंबोली ते महाबळेश्वरचे सर्व पाणी नृसिंहवाडीत येते. पुरातून कायमस्वरुपी सुटका होण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेण्याची गरज आहे. गेल्या १५ वर्षांत ४ मोठे महापूर आले, तरी केंद्र सरकारला गांभीर्य नाही असे सांगून शेट्टी यांनी केंद्र सरकार हे महाराष्ट्र विरोधी आहे. वादळ, पाऊस, पूर यामुळे महाराष्ट्राचे नुकसान होऊन देखील पंतप्रधान माेदी महाराष्ट्र दाैऱ्यावर आले नाहीत, मदतही दिली नाही. आपत्ती निवारण निधी हा काही माेदींचा निधी नाही, तो १९५० मध्ये पंडित नेहरू यांनी तयार केला होता. त्यात येणाऱ्या प्रत्येक सरकारने भर घालून आपत्तीवेळी तो दिलाही होता. पण आता मोदीसरकार करत असलेल्या सापत्नभावामुळे पूरग्रस्तांची होरपळ होत आहे. महापूर ही राष्ट्रीय आपत्ती असतानाही देखील केंद्र सरकार मदतीची घोषणा करत नाही, हे दुर्देवी आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेच्या गप्पा मारणाऱ्या मोदींकडे जाऊन मदत आणावी. स्वत: मुख्यमंत्री ठाकरे यांनी नेतृत्व केले तर राष्ट्रपतीभवनावरही मोर्चा काढू, त्यासाठी दोन रेल्वे गाड्या भाड्याने घेऊन देऊ असेही शेट्टी म्हणाले.
गेल्या चार दिवसांपासून सरकारने आंदोलन बेदखल केले होते. साधा तलाठीही फिरकला नव्हता आणि आज अलोट जनसागर पाहून धडकी भरल्यानंतर सरकारने लगेच चर्चेचे निमंत्रण दिले. याला आंदोलनासाठी आलेली डोकी कारणीभूत आहेत. आता या डोक्याचा विधायक वापर करून त्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही शेट्टी यांनी सांगितले. पूरग्रस्तांचे पुनर्वसन करताना जुनी जागा द्या, नवीन देतो असा फतवा काढणे चुकीचे आहे. आंबेवाडी, चिखली, खीद्रापूर, पारगाव या गावांनी पुनर्वसनाचा अनुभव घेतलेला पाहिला असल्याने बाकीच्या पूरग्रस्तांनी सरकारवर कसा विश्वास ठेवायचा? अशी विचारणाही केली.
तरुणांची लक्षणीय उपस्थिती
पदयात्रेत तरुणांची संख्या लक्षणीय होती. हे पाहून भारावलेल्या नेत्यांनीही तरुण वर्गच स्वाभिमानीचे पुढचे वारसदार आणि बॅंक बॅलन्स आहे. त्यांच्या हातात चळवळ सुरक्षित राहील, असा विश्वास व्यक्त केला. स्वत: शेंट्टी यांनीही तरुणांच्या मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल आभार मानले.
ऊस परिषदेची आठवण
स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचे नेटके संयोजन, आसुडाच्या फटके, वाजणारी हलगी आणि शेवटी शेट्टी यांची सभा आणि त्यांची सांगता शपथ घेऊन हे वातावरण पाहून दर वर्षी भरणाऱ्या ऊस परिषदेची आठवण येत होती. तसाच सर्वत्र माहोल होता.