‘मी कर्जमुक्त होणारच’ शिवसेनेचे सह्यांची मोहीम
By admin | Published: May 28, 2017 05:53 PM2017-05-28T17:53:07+5:302017-05-28T17:53:07+5:30
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पदाधिकारी ५ लाख अर्ज गोळा करणार
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २८ : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे,यासाठी शिवसेनेने आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू केला असून ‘मी कर्जमुक्त होणारच’ हे अभियान कोल्हापूरात उद्यापासून सुरू होत आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शिवसेनेचे पदाधिकारी पाच लाख अर्ज गोळा करून पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे देणार असल्याची माहिती जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
शिवसेनेच पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी नाशिक येथे कृषी मेळावा घेऊन कर्जमुक्तीसाठी रणशिंग फुंकले आहे. ज्याच्या जीवावर आज देशाचा डोलारा उभा आहे, तोच शेतकरी संकटात सापडला असताना सरकार गप्प बसणार असेल तर शिवसेना कदापि सहन करणार नसल्याचे त्यांनी सरकारला ठणकावून सांगितले आहे. शेतकऱ्यांच्या भावना व वेदना मुख्यमंत्र्यांना कळाव्यात यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी थेट बांधावर जाऊन त्यांना धीर देऊन प्रश्नोत्तराच्या स्वरूपात भावना गोळा करणार आहे.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून ५० हजार असे जिल्ह्यातून पाच लाख अर्ज एकत्रीत करून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे पाठविणार आहे. उद्या, दुपारी बारा वाजता कंदलगाव (ता. करवीर) येथून या मोहिमीची सुरूवात होणार असून जून अखेर सह्यांचे सर्व अर्ज पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार गजानन किर्तीकर व संपर्क प्रमुख अरूणभाई दुधवडकर यांच्या नेतृत्वाखाली सेवाभवनावर देणार असल्याचे संजय पवार यांनी सांगितले. त्यानंतर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लॉँगमार्च काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शेतकऱ्यांच्या लिखित भावना पोहचवणार असल्याचे विजय देवणे व मुरलीधर जाधव यांनी सांगितले.
यावेळी देवस्थान समितीचे सदस्य शिवाजीराव जाधव, शिवसेनेचे शहर प्रमुख दुर्गेश लिंग्रस आदी उपस्थित होते. बारा प्रश्नांतून सरकारचा पंचनामा! शिवसेनेच्या प्रश्नावलीत बारा प्रश्न आहेत. त्याच्या माध्यमातून सरकारच्या सर्व योजना व त्याच्या वस्तूस्थितीचा पंचनामा करण्याचा प्रयत्न आहे.