बालनाट्य स्पर्धेत ‘आता आमी शाळंला जाणार’ प्रथम
By admin | Published: October 28, 2015 11:59 PM2015-10-28T23:59:41+5:302015-10-29T00:08:11+5:30
गटस्तरीय बालनाट्य महोत्सव : अभिनयात मुलांत साळुंखे, तर मुलींत मंजद प्रथम
कोल्हापूर : गटस्तरीय बालनाट्य महोत्सवामध्ये कामगार केंद्र तासगाव (जि. सांगली)च्यावतीने सादर केलेल्या ‘आता आमी शाळंला जाणार’ या बालनाट्याने प्रथम क्रमांक, तर कामगार केंद्र माडगुळे (ता. सांगली)च्या ‘असा घडला शिवबा’ व मांजर्डे (ता. सांगली) केंद्राच्यावतीने सादर केलेल्या ‘स्त्री भू्रणहत्या’ या नाटकास तृतीय क्रमांक मिळाला.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, कोल्हापूरच्यावतीने बुधवारी इंदिरासागर हॉल, संभाजीनगर येथे आयोजित केलेल्या बालनाट्य महोत्सवात सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांतील कामगार कल्याण मंडळांचे १२ संघ सहभागी होते. या स्पर्धेत सांगली जिल्ह्यातील तासगाव, माडगुळे, मांजर्डे या केंद्रांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकाविले, तर कोल्हापुरातील फुलेवाडी कामगार केंद्राने सादर केलेल्या ‘पर्यावरण रक्षण-काळाची गरज’ या, तर कुंडल (सांगली)च्या ‘हम सब एक हैं’ या नाटकास उत्तेजनार्थ बक्षीस जाहीर करण्यात आले. उत्कृष्ट दिग्दर्शनाबद्दल मेघा कुलकर्णी (असा घडला शिवबा) या नाटकास प्रथम, तर भागवत खुळेकर यांना द्वितीय (आता आमी शाळंला जाणार), महेश शेटे यांना (स्त्री भू्रणहत्या)च्या दिग्दर्शनाबद्दल तृतीय क्रमांक मिळाला.
बक्षीस समारंभ हुतात्मा वारके सूतगिरणीचे कार्यकारी संचालक मिलिंद कुलकर्णी व शिवाजी विद्यापीठ नाट्यशास्त्र विभागाचे प्रा. विजय पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी कोल्हापूर गट कार्यालयाचे कामगार अधिकारी संभाजी पवार, परीक्षक कपिल मुळे, किरण चव्हाण, राज पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघसेन जगतकर, राजेंद्र निकम, चंद्रकांत घारगे, अरुण लाड, पीयूष पाटील, महेश रसाळ, आदींनी परिश्रम घेतले.
+++उत्कृष्ट अभिनय
मुले - सोमनाथ साळुंखे - ‘आता आमी शाळंला जाणार’ यामधील ‘विट्या’च्या भूमिकेबद्दल, तर विश्वराज पाटील याला ‘हम सब एक हैं’मधील ‘पंजाबी’च्या भूमिकेबद्दल द्वितीय आणि आशिष खांडेकर याला ‘स्वराज्य प्रतिज्ञा’ या नाटकातील ‘शिवाजी’ या भूमिकेबद्दल तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले. मुलींमध्ये सुजाता मंजद हिला ‘स्त्रियांवरील अत्याचार’ या बालनाट्यातील सासूच्या भूमिकेबद्दल प्रथम, तर ऋचा जोशी हिला ‘असा घडला शिवबा’ या नाटकातील ‘शिवाजी’ या भूमिकेबद्दल आणि सुहाना चौगुले हिला ‘मोरू माली दमाल रिटर्न’ या नाटकातील ‘मास्तर’च्या भूमिकेबद्दल तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.