Kolhapur: मी आघाडीसोबत जाणार नाही, त्यांनी पाठिंबा द्यावा; राजू शेट्टींचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 04:53 PM2024-03-11T16:53:13+5:302024-03-11T16:57:40+5:30
'त्यांना खोटा प्रचार करण्यासाठी वाव देणार नाही'
दत्तवाड : लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात एकास एक उमेदवार देण्याचे इंडिया आघाडीचे धोरण चांगले आहे. इंडिया आघाडीने मला पाठिंबा द्यावा, परंतु मी आघाडीबरोबर जाणार नाही. कारण मी आघाडीबरोबर गेलो तर भाजपवाले मी कारखानदाराबरोबर गेलो असा खोटा प्रचार करतात. त्यांना खोटा प्रचार करण्यासाठी वाव देणार नाही. यासाठी आघाडीने उमेदवार उभा न करता मला पाठिंबा द्यावा, असे आवाहन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.
दत्तवाड (ता. शिरोळ) येथे विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. देशभर इंडिया आघाडीने भाजप विरोधात एकास एक उमेदवार देण्याचे ठरविले आहे. यासाठी उत्तर प्रदेश, बिहारमध्ये तेजस्विनी यादव, अखिलेश यादव व राहुल गांधी यांच्यात समेट झाला आहे. तोच फॉर्म्युला महाराष्ट्रात वापरून महाराष्ट्रातदेखील भाजप व त्यांच्या मित्र पक्षांना हरविण्यासाठी भाजप विरोधात एकच उमेदवार देण्याचे धोरण ठरविले आहे.
मात्र, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानीच्या राजू शेट्टी यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्याने तेथे तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. यावर शेट्टी म्हणाले, मी आघाडीबरोबर जाणार नाही. आघाडीने माझ्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा.
यावेळी सरपंच चंद्रकांत कांबळे, उपसरपंच नूर काले, बसगोंडा पाटील, मलगोडा पाटील, एन.एस. पाटील, विवेक चौगुले, सुनील नेजे, अजित चौगुले, शामराव सुतार, शीतल सुरवसी, तेजस वराळे, प्रवीण सुतार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.