मला अध्यक्ष करून चूक केल्यासारखे वाटेल
By admin | Published: August 9, 2016 12:04 AM2016-08-09T00:04:11+5:302016-08-09T00:24:38+5:30
चंद्रकांतदादा पाटील : विवेकानंद संस्थेने विविध अभ्यासक्रमांची निर्मिती करावी
कोल्हापूर : काही संस्थांमध्ये अध्यक्ष हे येऊन केबिनमध्ये बसून चहा पिऊन जातात; पण मी असा अध्यक्ष नाही. विवेकानंद शिक्षण संस्थेला विकासाच्यादृष्टीने जे उद्दिष्ट, ध्येय देईन, त्याच्या पूर्ततेसाठी येत्या तीन वर्षांत संस्थेतील प्रत्येक घटकाला माझ्या गतीने काम करावे लागेल. त्यामुळे मला अध्यक्ष करून चूक केल्यासारखे वाटेल, असे प्रतिपादन पालकमंत्री व संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी येथे केले.
शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या २९ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. विवेकानंद महाविद्यालयातर्फे आयोजित डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवनातील कार्यक्रमास ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ प्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, संस्थेचे अध्यक्षपद स्वीकारण्यास मी तयार नव्हतो पण, कार्याध्यक्षांनी वारंवार आग्रह केल्यानंतर अखेर पद स्वीकारले. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे कार्य हे दीपस्तंभासारखे सर्वांना मार्गदर्शक, प्रेरणादायी आहे. कार्यक्रमात दहावी-बारावी परीक्षेतील गुणवंतांचा आणि शाहीर भूषण पुरस्कारप्राप्त कुंतिनाथ करके यांचा प्रमुख उपस्थितांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संस्थेची निकाल संकलन व संस्था मूल्यांकन, आदी पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्राचार्य हिंदुराव पाटील, डॉ. शरदचंद्र साळुंखे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राजाराम शिपुगडे, माणिक पाटील-चुयेकर आदी उपस्थित होते. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. अभयकुमार साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. सहसचिव डॉ. अशोक करांडे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. सचिव प्राचार्या शुभांगी गावडे यांनी आभार मानले. दरम्यान, कार्यक्रमापूर्वी प्रमुख पाहुण्यांनी डॉ. बापूजी साळुंखे व संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले. (प्रतिनिधी)