‘आईस हॉकी’ला प्रतीक्षा मान्यतेची

By admin | Published: October 15, 2015 12:03 AM2015-10-15T00:03:51+5:302015-10-15T00:03:51+5:30

निकष पूर्ण : खेळाडू आरक्षणापासून वंचित

'Ice Hockey' approval is waiting | ‘आईस हॉकी’ला प्रतीक्षा मान्यतेची

‘आईस हॉकी’ला प्रतीक्षा मान्यतेची

Next

आदित्यराज घोरपडे-- सांगली-‘आईस हॉकी’ हा बर्फावर खेळला जाणारा सर्वांत वेगवान खेळ असला तरी जागतिक कीर्ती मिळवलेल्या या खेळाची महाराष्ट्रात मात्र उपेक्षा सुरू आहे. पात्रतेचे सर्व निकष पूर्ण करूनही ‘आईस हॉकी’ला महाराष्ट्र आॅलिम्पिक असोसिएशनच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे. आईस हॉकी असोसिएशन आॅफ महाराष्ट्रची नोंदणी २०१३ मध्ये मुंबईत झाली. इंडियन आॅलिम्पिक असोसिएशन, इंटरनॅशनल आॅलिम्पिक कमिटी, इंटरनॅशनल आईस हॉकी फेडरेशन व केंद्रीय क्रीडा मंत्रालयाची आईस हॉकीला मान्यता आहे. दर चार वर्षांनी होणाऱ्या विंटर आॅलिम्पिक स्पर्धेत आईस हॉकीच्या स्पर्धाही होतात. जागतिक पातळीवर ग्लॅमरस बनत चालेल्या या खेळाची महाराष्ट्रात वाताहत होत आहे. आईस हॉकीला ‘अच्छे दिन’ आणण्यासाठी राज्याध्यक्ष राजाराम चव्हाण, उपाध्यक्ष शशांक वाघ व सरचिटणीस प्रशांत चव्हाण यांनी कंबर कसली आहे. महाराष्ट्र असोसिएशनची मान्यता मिळण्यासाठीच्या पात्रतेचे चौदा निकष २०१४ मध्येच पूर्ण केले आहेत. ही मान्यता मिळाल्यानंतर अनेक अडथळे दूर होणार आहेत. ३० एप्रिल २००५ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय व निमशासकीय नोकरीत पाच टक्के आरक्षण देण्यात येते. या शासन निर्णयाच्या परिशिष्ट ‘अ’मधील यादीत ३१ व्या क्रमांकावर ‘आईस हॉकी’चा समावेश होता. ६ मे २००८ च्या परिपत्रकाने मात्र पाच टक्के आरक्षणाच्या यादीतून वगळण्यात आले. दरवर्षी महाराष्ट्रात आईस हॉकीच्या सीनिअर मुले-मुली (२० वर्षावरील), ज्युनिअर मुले-मुली (१६ ते २० वर्षे), सबज्युनिअर मुले-मुली (१० ते १६ वर्षे) या अधिकृत राज्यस्तरीय स्पर्धा होतात. राज्यात तीन हजारपेक्षा अधिक आईस हॉकीचे खेळाडू आहेत.
लडाख (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने कांस्यपदक, तर गुडगाव (दिल्ली) येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक पटकावले आहे. जागतिक स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा अव्वल खेळाडू सूरज कृष्णदेव पवार याची भारतीय संघात निवडही झाली आहे.
महाराष्ट्राचे नाव देशपातळीवर गाजवणाऱ्या या खेळाचा समावेश राज्य सरकारने पुन्हा अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाच्या यादीत करण्याची गरज आहे. संघटनेने या मागणीचे निवेदन १२ आॅक्टोबरला क्रीडामंत्री विनोद तावडे यांना दिले आहे.
या खेळास पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे मुंबई-पुणे-दिल्ली असे दौरे सुरू आहेत.


असा आहे आईस हॉकी...
कॅनडा या देशात आईस हॉकी खेळाचा जन्म.
रशिया, कॅनडा, अमेरिका, स्वित्झर्लंड, भारत, इंग्लंड, फिनलंड, जपान, कोरिया, चीन, आॅस्ट्रेलिया, व्हीएतनाम, ब्राझील, थायलंड, स्पेन, सिंगापूर यांसह जगातील ११६ देशांमध्ये तो खेळला जातो.
आईस हॉकी असोसिएशन आॅफ इंडियाची स्थापना दिल्ली येथे १९९१ मध्ये झाली.
आईस हॉकीच्या जगात...
आईस हॉकीसाठी लागणारे साहित्य : चेसगार्ड, नेकगार्ड, आर्मगार्ड, सेंटरगार्ड, स्केट, स्टीक, पक (बॉल).
मैदान : लांबी ६० मीटर, रुंदी ३० मीटर
एकूण खेळाडू : २२ (राखीव १६)
वेळ : ३० मिनिट (३ राऊंड)
खेळाडूंच्या जागा : गोलकिपर (१), डिफेन्सर (१), अ‍ॅटॅकर (४)
स्टीकच्या मदतीने जास्तीत जास्त गोल करणारा संघ विजयी होतो.

Web Title: 'Ice Hockey' approval is waiting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.