इचलकरंजीत ठेकेदारास घेराव

By Admin | Published: February 12, 2015 12:06 AM2015-02-12T00:06:49+5:302015-02-12T00:23:12+5:30

झोपडपट्टीवासीयांचा पुनर्वसन प्रश्न : इमारतींचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन

Ichalkaranjat Contractor's surroundings | इचलकरंजीत ठेकेदारास घेराव

इचलकरंजीत ठेकेदारास घेराव

googlenewsNext

इचलकरंजी : एकात्मिक झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत सुरू असलेल्या व जयभीमनगरमधील १४ इमारती सप्टेंबर २०१५ पर्यंत पूर्ण करून देऊ. उर्वरित तीन इमारतींसाठी वाढलेल्या महागाईच्या प्रमाणात बांधकामाचा वाढीव दर मिळाला, तर त्याही इमारती बांधून पूर्ण करण्यात येतील, असा निर्णय ठेकेदार नरेंद्र कन्स्ट्रक्शनचे दिनेश शहा यांनी दिल्यानंतर झोपडपट्टीवासीय लाभार्थींनी घातलेला घेराव उठविण्यात आला.
केंद्र सरकारच्या एकात्मिक झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत येथील जयभीम झोपडपट्टीमधील ७२० लाभार्थ्यांची घरकुले अपार्टमेंट पद्धतीने बांधण्याची सुमारे ३५ कोटी रुपये खर्चाची योजना नगरपालिकेने हाती घेतली आहे. जयभीमनगरातील एकूण १७ इमारतींपैकी १४ इमारतींचे बांधकाम सध्या चालू आहे. या इमारतींचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले असताना वाळूचे दर मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे कारण देत मक्तेदार नरेंद्र कन्स्ट्रक्शन यांनी काम बंद ठेवले. काम बंद ठेवल्याचे लक्षात येताच संतप्त झालेल्या लाभार्थ्यांनी त्याठिकाणी असलेल्या कामगारांना हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, कॉँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील यांनी मक्तेदार शहा यांच्याशी संपर्क साधून लाभार्थ्यांमध्ये असलेला असंतोष त्यांना सांगितला.
मक्तेदार शहा यांच्याशी चर्चा करताना पाटील यांनी पुनर्वसनाच्या इमारतींचे काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत सांगण्याचा आग्रह धरला. मात्र, बांधकामाच्या साहित्याच्या दरामध्ये सातत्याने होणारे चढ-उतार पाहता बांधकामासाठी वाढीव दर मिळावा; अन्यथा काम करणे अवघड होईल, असे मक्तेदार शहा यांनी स्पष्ट केले. या समस्येवर मार्ग काढण्यासाठी मुख्याधिकारी सुनील पवार यांना पाचारण करण्याचे ठरले. मात्र, मुख्याधिकाऱ्यांची तब्बेत बरी नसल्याने ते येऊ शकले नाहीत.
अखेर बांधकामाच्या कच्च्या मालाचे वाढलेले दर विचारात घेऊन त्याचा फरक देण्याची मागणी करीत मक्तेदार शहा यांनी सध्या अंतिम टप्प्यात असलेल्या १४ इमारती सप्टेंबर २०१५ पर्यंत पूर्ण करण्याची ग्वाही दिली. उरलेल्या तीन इमारतींसाठी एकूणच वाढलेल्या बांधकाम खर्चासाठी बांधकामाचा दर वाढवून मिळाल्यास त्या पूर्ण केल्या जातील, असे सांगितले. त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली जाईल, असे स्पष्ट केले आणि मक्तेदार शहा यांना घातलेला घेराव उठविण्यात आला. (प्रतिनिधी)

'लाभार्थ्यांच्या प्रश्नांनी ठेकेदारास भंडावून सोडले
बुधवारी सायंकाळी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांच्या दालनात मक्तेदार दिनेश शहा, पक्षप्रतोद सुनील पाटील, बांधकाम सभापती भाऊसाहेब आवळे, जलअभियंता बापूसाहेब चौधरी, आदींची बैठक सुरू होती. त्याचवेळी जयभीमनगरातील लाभार्थी सतीश टेकाळे, प्रकाश पाटील, विठ्ठल शिंदे, दत्ता चंदनशिवे, अमर पार्टे, आदींनी येऊन मक्तेदार शहा यांना घेराव घातला. संतप्त लाभार्थ्यांनी त्यांना अनेक प्रश्न विचारून अक्षरश: भंडावून सोडले. त्यावेळी संतप्त लाभार्थ्यांना नगराध्यक्षा बिरंजे, पक्षप्रतोद पाटील, सभापती आवळे यांनी शांत केले.

Web Title: Ichalkaranjat Contractor's surroundings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.